You are currently viewing सक्रिय क्षयरुग्ण व कृष्ठरुग्ण शोध मोहिम

सक्रिय क्षयरुग्ण व कृष्ठरुग्ण शोध मोहिम

सिंधुदुर्गनगरी 

समाजातील क्षयरुग्ण व कृष्ठरुग्णांचे लवकरात लवकर निदान करून त्यांना औषधोपचाराखाली आणणे, संसर्गाची साखळी खंडीत करुन प्रचार रोखणे, समाजामध्ये क्षयरोग व कृष्ठरोगाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करणे या उद्देशाने जिल्ह्यामध्ये दिनांक 1 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2020 या दरम्यान संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व कृष्ठरुग्ण शोध मोहिम अभियान राबविण्यात येणार आहे.

            जिल्ह्यामध्ये सध्या 638 क्षयरुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना पोषण योजनेअंतर्गत दरमहा 500 रुपये प्रमाणे औषधोपचारासाठी लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्याकरिता 7 लाख 34 हजार 314 इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांच्या पथकामार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी 814 पथके नेमण्यात आली आहेत. गृहभेटीमध्ये कुटुंबातील सदस्यांची तपासणी स्वयंसेवकामार्फत करण्यात येणार आहे.

            क्षयरोगाची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत. दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा खोकला, दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट, भूक मंदावणे, मानेवर गाठी येणे व इतर. तर कुष्ठरोगाची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत. अंगावर फिकट लालसर चट्टा, चकाकणारी तेलकट त्वचा व अंगावरील गाठी, हातापायांमध्ये बधिरता व शारिरीक विकृती.

            तरी या मोहिमेअंतर्गत तपासणीसाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना सहकार्य करून हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन सहाय्यक संचालक आरोग्य सेवा व जिल्हा क्षयगोर अधिकारी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 6 =