इचलकरंजी : प्रतिनिधी
हेरवाड येथील हेरवाड हायस्कूलमध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत माता पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत गहू, तांदूळ, ज्वारी, मका, नाचणी, वरी, ओट्स, बाजरी, वरी, राळे, सातू या तृणधान्यापासून पदार्थ बनवले होते. जास्तीत जास्त पौष्टिक ,दैनंदिन आहारात समावेश असलेले, आरोग्यासाठी चांगले तसेच पदार्थांची चव चांगली,पदार्थ मांडणीमध्ये नाविन्यपूर्णता असलेल्या, बनवण्यास सोपे असलेले व तयार करताना इंधन कमी वापरले गेलेल्या पाककृतींना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आरोग्य अधिकारी डॉ. वंदना गिरमल व आरोग्यसेविका मनीषा पंढरपुरे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हेरवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच रेखा जाधव हजर होत्या. मुख्याध्यापिका माणिक नागावे यांच्या हस्ते सरपंच रेखा जाधव व परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. पाककला स्पर्धेतील विजेत्या सपना संजय नेर्ले-प्रथम,कविता रावसाहेब पाटील-द्वितीय,दिप्ती रवींद्र पाटील-तृतीय यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. वंदना गिरमल यांनी शरीराला पोषक अन्नधान्याची गरज आहे. ती विविध पाककृतींच्या माध्यमातून पूर्ण होते,असे सांगून आयुष्यमान भारत कार्डबद्दल सविस्तर माहिती सांगीतली.सरपंच रेखा जाधव यांनी पाककृती या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करुन सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे अभिनंदन केले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहायक शिक्षिका मुनिसा पठाण,सिमा माळी व प्रमिला लोंढे आदींनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी स्पर्धक,सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.