You are currently viewing महाराष्ट्र सरकारच्या कंत्राटी भरती विरोधात गणेशोत्सवानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना छेडणार आंदोलन – आ. वैभव नाईक

महाराष्ट्र सरकारच्या कंत्राटी भरती विरोधात गणेशोत्सवानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना छेडणार आंदोलन – आ. वैभव नाईक

*महाराष्ट्र सरकारच्या कंत्राटी भरती विरोधात गणेशोत्सवानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना छेडणार आंदोलन – आ. वैभव नाईक*

*कंत्राटी भरतीसाठी नेमलेल्या ९ कंपन्या भाजपच्या निकटवर्तीयांच्या तर एक कंपनी भाजप आमदाराची*

*कंत्राटी भरती प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव*

महाराष्ट्र सरकराने शासनाच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे धोरण आखले आहे.शासन निर्णयाद्वारे कंत्राटी पदे भरण्यासाठी ९ कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कंत्राटी भरतीने मिळालेल्या नोकरीची शाश्वती दिली जात नाही. पगार देखील वेळेवर दिले जात नाहीत हे आतापर्यंत केलेल्या कंत्राटी भरतीचे उदाहरण आहे. आणि आता सर्वच ठिकाणी कंत्राटी भरती प्रक्रिया राबविली गेल्यास मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जाणार आहे. तसेच शासनाच्या भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून या कंत्राटी भरतीला तीव्र विरोध होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण बेरोजगारांचा देखील याला विरोध आहे. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष साथ देणार आहे. हि कंत्राटी भरती रद्द करून शासनाने लवकरात लवकर शासकीय भरती प्रक्रिया राबवावी यासाठी गणेशोत्सव झाल्यावर शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तरुण बेरोजगारांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडणार आहोत असा इशारा कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

आ. वैभव नाईक म्हणाले, महाराष्ट्र सरकारने काढलेल्या शासन निर्णयात कंत्राटी पदे भरण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या ९ कंपन्या भाजपच्या निकटवर्तीयांच्या आहेत. यातील क्रिस्टल इंटग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. हि कंपनी तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची आहे. या कंपनीने याआधी अनेक विभागात कंत्राटी पदे भरण्याचा ठेका घेतला होता आणि त्यातील कर्मचारी वर्गाचा पगार थकविला होता हा इतिहास आहे.
यापूर्वी झालेल्या शासनाच्या कंत्राटी भरतीत एनआरएचएम अंतर्गत आरोग्य सेवक कंत्राटी पद्धतीने भरलेले आहेत. त्यांना पगार कमी दिला जातो. तसेच भविष्यात त्यांना नोकरीची शास्वती दिली जात नाही. १० ते १५ वर्षे काम करून देखील त्यांना नियमित केले जात नाही.
विद्युत कर्मचारी देखील कंत्राटी पद्धतीने घेतले आहेत त्यांना देखील पगार वेळेवर दिला जात नाही. त्याचबरोबर त्यांना दुखापत झाली, ऑन ड्युटी असताना अपघात होऊन जीवित हानी झाली तरी त्यांना शासनाची मदत मिळत नाही.त्यामुळे कंत्राटी विद्युत कर्मचाऱ्यांचे जीवन अंधारमय आहे. कुडाळ येथील महिला हॉस्पिटलमध्ये देखील कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरती केले आहेत त्यांना पगार वेळेवर मिळत नाही. याउलट कंत्राटदारानेच कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले आहेत. त्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार केला जात आहे. शासनाची कंत्राटी भरती प्रक्रिया पार पडल्यास असाच भ्रष्टाचार होणार आहे. शासकीय रुग्णालयातील ऍम्ब्युलन्सचे ड्रायव्हर देखील कंत्राटी पद्धतीने भरती केले त्यांनाही पगार वेळेवर मिळत नाही.वीज बिल रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील पगार वेळेवर दिला जात नाही आणि कमी पगार देऊन कंत्राटदार त्यांची फसवणूक करतात. त्यामुळे या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारमय आहे.
त्यामुळे हि कंत्राटी भरती रद्द करून शासनाने लवकरात लवकर शासकीय भरती प्रक्रिया राबवावी. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सिंधुदुर्गात तीव्र आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा