मुंबई :
मसुरे चांदेर मायने वाडी येथील मूळ रहिवासी आणि मुंबई भायखळा येथे वास्तव्यास असलेले प्रसिद्ध मूर्तिकार, आर्टिस्ट आणि समाजसेवक अशोक शंकर परब वय 65 वर्ष यांचे मुंबई येथे नुकतेच आकस्मिक निधन झाले. मंगळवारी दुपारी मुंबई भायखळा येथील स्मशानभूमी मध्ये हजारो संख्येच्या गर्दीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोक परब यांच्या निधनामुळे मसुरे गावावरती शोककळा पसरली आहे.
अशोक परब हे मुंबई भायखळा येथे गणेश मूर्तिकार म्हणून प्रसिद्ध होते. महाराष्ट्र शासनासहित विविध संस्थांचे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. मुंबईमधील महानगरपालिकेचा सर्वोत्कृष्ट गणेश मूर्तिकार म्हणून सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला होता. मसुरे गावातील गोरगरीब जनतेचे ते आधारवड म्हणून प्रसिद्ध होते. अनेक गरजू रुग्णांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी वेळोवेळी मदत केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावातील गरजवंत रुग्णांना मुंबईमधील के ई एम, नायर, सायंन हॉस्पिटल या रुग्णालयामध्ये लागणारी सर्वतोपरी मदत ते स्वतः करत होते. अनेक गरजवंतांना त्यांनी आपल्या गणेश कारखान्यात मोफत राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. मसुरे परिसरा सहीत मुंबईमध्ये सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. गावातील सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक धार्मिक वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे होते. अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. विविध प्रकारचे वैद्यकीय मोफत कॅम्प ठीक ठिकाणी त्यांनी घेतले होते. कोविड काळामध्ये अनेक गरजू कुटुंबांना त्यांनी स्वखर्चाने मदत करून सहकार्य केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, चार भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुंबई येथील युवा मूर्तिकार ओमकार परब यांचे ते वडील आणि मसुरे येतील सामाजिक कार्यकर्ते अजा परब यांचे ते भाऊ होतं होतं.