राजकीय पटलावर सध्या वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढीव वीजबिल माफीसाठी आक्रमक झाली असून संपूर्ण राज्यात या विरोधात त्यांनी जोरदार आंदोलन सुरू केलं आहे.
आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत असून ठिकठिकाणी पोलीस आणि कार्यकर्त्यांच्यात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी देखील या आंदोलनात सामील व्हावं, असं आवाहन मनसे कडून करण्यात येत आहे. हा प्रचंड प्रमाणात आक्रोश असून जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा देखील बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.
आज, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, नाशिक, पनवेल आदी शहरांत मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. मात्र, या सर्वच शहरात मनसेच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कर्त्याकर्ते आणि पोलिसांच्यात बाचाबाची झाल्याचं समोर येत आहे.
मुंबईत मनसेने तुफान मोर्चा काढला असून आंदोलना दरम्यान ठाण्यात पोलिसांनी 144 कलम लागू करून जमावबंदीचे आदेश जारी केले असूनही मनसेच्या आंदोलनामूळे पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आहे. त्यामुळे तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आंदोलकांचा मोर्चा वाटेतच अडवल्याने मनसे कार्यकर्त्यांनी हलकल्लोळ माजवला आहे. यामुळे मनसे नेते अभिजीत पानसे, अविनाश जाधव आणि रवी मोरेंसह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. भाजपने मोर्चा काढला. त्यांना परवानगी मिळते. आम्हाला परवानगी दिली जात नाही. हा कुठला न्याय? ठाकरे सरकार मनसेला घाबरत आहे का?, असा सवाल करतानाच हे सरकार उखडून फेकायचं आहे. काँग्रेसला श्रेय मिळू नये म्हणून शिवसेनेकडून वीजबिल माफीला मंजुरी दिली जात नाही, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला.
कोकण भवन वरही मनसेने तीव्र मोर्चा काढला, तर अंबरनाथ मध्ये 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी जमावबंदी च उल्लंघन केल्यामुळे ताब्यात घेतले. तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खाणीवडे टोल नाक्यावर सर्व मनसे कार्यकर्त्यांच्या ‘आघाडी सरकारचा निषेध असो’, ‘राज ठाकरे यांचा विजय असो’, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्याने संपूर्ण परिसर दणाणून तर सोडलाच शिवाय मोठ्या संख्येने रस्त्यावर कार्यकर्ते उतरल्याने वाहतूक कोंडी सुध्दा झाली.
पुण्यातही मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांना आंदोलन करते वेळी ताब्यात घेतल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं. राज्यात मनसेने असे ठिकठिकाणी आक्रमक आंदोलन केल्यामुळे पोलिसही संतप्त झाले आहेत.