You are currently viewing नवरात्रीमध्ये सलग सहाव्यांदा ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठक बोरीवलीत आपल्या लोकगीतांनी करणार रसिकांना मंत्रमुग्ध

नवरात्रीमध्ये सलग सहाव्यांदा ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठक बोरीवलीत आपल्या लोकगीतांनी करणार रसिकांना मंत्रमुग्ध

*कर्करोग पीडितांसाठी २१ लाखांची देणगी देण्याचा संकल्प*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

‘दांडिया क्वीन’ या उपाधीने नावाजलेली फाल्गुनी पाठक बोरीवली येथे ‘शो ग्लिट्झ इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट’द्वारे आयोजित नवरात्रोत्सवात सलग सहाव्यांदा सादरीकरण करणार आहे. लोकांच्या मागणीला मान देऊन फाल्गुनी पाठक पुन्हा एकदा गुजराती बहुल ‘बोरीवली’ परिसरात आपल्या आवाजाच्या जादूने गरबा-रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे. फाल्गुनी पाठक २०१६ पासून बोरीवलीमध्ये नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम सादर करत आहे. बोरीवली येथील कै. प्रमोद महाजन मैदानामध्ये दांडिया क्वीनच्या नवरात्रीचे आयोजन करण्यात येणार आहे.

शो ग्लिट्झ इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटने बोरीवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत फाल्गुनी पाठक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “गेल्या वर्षी आम्ही गरबा प्रेमींसाठी एक नवीन गाणे सादर केले होते. या वर्षी रंगमंचावर तुम्हाला आणखी काय नवीन पाहायला मिळेल, हे आम्ही गुपित ठेवलं आहे. मी जगातील सर्वात मोठ्या नृत्य महोत्सवात सर्व रसिकांचे स्वागत करते.

पत्रकार परिषदेला उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते. या प्रसंगी संबोधित करताना ते म्हणाले की, “दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक बोरीवलीत सलग सहाव्यांदा सादरीकरण करणार आहे, हे उत्तर मुंबईचे भाग्यच म्हणावे लागेल. आजच्या बदलत्या काळात माणसं आपल्या गरजेच्या गोष्टींमध्ये सुद्धा झपाट्याने बदल करत आहेत, तरी देखील फाल्गुनी पाठकची क्रेझ लोकांच्या मनात आजही टिकून आहे. यावरून हेच सिद्ध होतं की इथल्या नवरात्री उत्सवात संगीतासोबत धार्मिक समन्वय देखील साधला जातो.

या प्रसंगी गोपाळ शेट्टी यांनी विद्यमान वर्षात ४ दिवस नवरात्रोत्सव मध्यरात्री १२ वाजेपर्यंत आयोजित करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती राज्य सरकारला केली आहे.

शो ग्लिट्झ इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे या भव्य नवरात्रोत्सवाचे आयोजक आहेत. कंपनीचे संचालक संतोष सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “कलाकार आणि आयोजक कोणताही कार्यक्रम तेव्हाच यशस्वी करुन दाखवू शकतात, जेव्हा त्यात लोकांचा खुल्या मनाने सहभाग असतो. गेल्या पाच वर्षांत लोकांनी आम्हाला जे प्रेम दिले, ते प्रेम यावर्षी देखील मिळेल, असा आम्हांला विश्वास आहे.” याप्रसंगी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, या कार्यक्रमातून झालेल्या आर्थिक लाभातून कर्करोग पीडितांना २१ लाख रुपयांची देणगी देण्याचा संस्थेचा मानस आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा