You are currently viewing सरिता पवार यांच्या ‘तिची वारी’ कथेला राज्यस्तरीय पारितोषिक

सरिता पवार यांच्या ‘तिची वारी’ कथेला राज्यस्तरीय पारितोषिक

कणकवली

सांगली येथील चारुतासागर प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कथाकार चारूतासागर यांच्याच स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कथा स्पर्धेत येथील कवयित्री-लेखिका सरिता पवार यांच्या कथेला दुतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. नागपूर ते गोवा, बेळगाव अशा विविध भागातून यावर्षी या स्पर्धेला कथा आल्या होत्या. त्यात उत्कृष्ट कथा म्हणून पवार यांच्या ‘तिची वारी’ या कथेची निवड करण्यात आली. श्रीमती पवार या गेले वीस वर्ष कविता, कथा, ललित आदी साहित्य प्रकारात सातत्याने लेखन करत आहेत. सिंधुदुर्गच्या साहित्य चळवळीतही कार्यकर्त्या म्हणून वावरताना सध्या त्या सिंधुदुर्ग जिल्हा कवी लेखक संघटनेच्या जिल्हा सचिव म्हणून काम पाहत आहेत. परिवर्तनाची भूमिका हे त्यांच्या एकूण लेखनाचं सूत्र राहिल आहे. माणसाकडून माणसाकडे जाणे आणि माणसांना स्नेहभावाने एकत्र ठेवणे हा विचार घेऊन त्या कविता, कथा, लेखन करत आहेत. यामुळेच आजच्या भेदाच्या वातावरणाचे प्रतिबिंब त्यांच्या कविता लेखनात दिसते.सदर पारितोषिक प्राप्त ‘तिची वारी’ या कथेतही सदर विचार वाचकाला आढळत असल्याने पवार यांची सदर कथा वाचताना वाचक अंतर्मुख होत जातो असे मत या स्पर्धेच्या परीक्षकांनी नोंदवले आहे. चारुतासागर या स्पर्धेला मराठी साहित्यात प्रतिष्ठा असून या वर्षीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक नागपूरच्या डॉ. विशाखा कांबळे यांच्या ‘स्पर्शबंध’ या कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला तर तृतीय क्रमांक कवठेमहांकाळ येथील आप्पासाहेब पाटील यांच्या ‘आक्रीत’ या कथेने प्राप्त केला तर उत्कृष्ट लेख पारितोषिक पुण्याच्या मानसिक चिटणीस यांनी प्राप्त केला. या सर्व पुरस्कार विजेत्यांना पुढील कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या साहित्य संमेलनात पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. आबासाहेब शिंदे यांनी दिली असून श्रीमती पवार यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्गातील साहित्य चळवळीतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा