मळगाव येथील रवळनाथ देवाचा वार्षिक हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा
सावंतवाडी
मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथाचा सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह भाविकांच्या गर्दीत व मानकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. मळगाव येथील स्थानिक भजन मंडळांनी ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे आपली भजने सादर केली. या दोन दिवसीय हरिनाम सप्ताहाची आज दिंडी व महाप्रसादाने सांगता करण्यात आली. मळगावातील भाविकांनी हरिनाम सप्ताहाचा लाभ घेतला.
बुधवार सकाळपासून हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली. यानिमित्त रवळनाथाची मूर्ती सुशोभित वस्त्र घालून नटविण्यात आली होती. भाविकांनी सकाळपासून गर्दी करून श्री देव रवळनाथाचे दर्शन घेतले. यावेळी देवाला केळी, नारळ अर्पण करण्यात आले. हरिनाम सप्ताहानिमित्त मंदिरात धार्मिक विधी, श्री देव रवळनाथ देवावर अभिषेक, होमहवन, मंत्रपठण, तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम ब्राम्हणांच्या साक्षीने पार पडले. यनिमित्त सकाळपासून मळगाव येथील गणेश प्रसादी मंडळ (नाईकवाडी), भूतनाथ भजनमंडळ (कुंभारवाडी), ओमकार भजनमंडळ (आजगावकरवाडी), पाडगावकर भजनमंडळ (पाडगावकरवाडी), जय हनुमान भजनमंडळ (पिंपळवाडी), अष्टविनायक भजनमंडळ (कुंभारआळी), बाळ गोपाळ भजनमंडळ (तेलकाटावाडी), धाव गिरोबा भजनमंडळ (सावळवाडा), मायापूर्वचारी भजनमंडळ (बादेकरवाडी), विठ्ठल-रखुमाई भजनमंडळ (कुडववाडी), महापुरुष भजनमंडळ (जोशी-मांजरेकरवाडी), बंटी मेस्त्री भजनमंडळ (सुतारवाडी), इस्वटी भजनमंडळ (रेडकरवाडी), राष्ट्रोळी भजनमंडळ (वरची देऊळवाडी) आदी स्थानिक भजनमंडळांनी ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे आपली भजने सादर केली. या भजनांचा मळगावातील भजनप्रेमींनी लाभ घेतला. आज गुरुवारी सकाळी विठू नामाच्या जयघोषात व ढोलांच्या गजरात भव्य अशी दिंडी काढून नारळ नदीत अर्पण करण्यात आला. त्यानंतर गोपाळकाला व त्यानंतर आरती पार पडली. दुपारी रवळनाथ मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादानंतर सामूहिक गाऱ्हाणे घालून हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. मळगावातील भाविकांनी हरिनाम सप्ताहाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.