You are currently viewing आगरी साहित्य संमेलनात झाला लोकशाहीर शनी कुमार यांचा जागर

आगरी साहित्य संमेलनात झाला लोकशाहीर शनी कुमार यांचा जागर

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

आगरी ग्रंथालय चळवळ आयोजित “सरावनसरी” या पावसाळी आगरी साहित्य संमेलनाचे आयोजन भिवंडी येथील प्रसिद्ध दिंडीगड येथे करण्यात आले होते. या एक दिवसीय साहित्य संमेलनात विविध चर्चासत्र आणि कवी संमेलन आयोजित केले होते. त्यात स्वर्गीय लोकशाहीर शनी कुमार शेलार साहित्यिक कट्ट्यावर स्वर्गीय लोकशाहीर शनी कुमार यांच्या महाराष्ट्रातील लोककलेच्या योगदानाचा जागर करण्यात आला. या चर्चासत्रात दिग्गज गायक साहित्यिकांनी सहभाग घेतला. प्रसिद्ध गायक संगीतकार किसन फुलोरे, बिग बॉस मधून जगभर पोचलेले आगरी गोल्डन मॅन सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी, रसिकाच्या लग्नात फेम ठाणा बँड पॅटर्नचे जनक साईभक्त सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील, प्रसिद्ध कवी गीतकार दिग्दर्शक रामनाथ म्हात्रे, सुप्रसिद्ध नाट्य अभिनेते मयुरेश कोटकर, स्वर्गीय बाबुलनाथ नाईक यांचे सुपुत्र प्रसिध्द गायक विजय नाईक, प्रसिद्ध गीतकार कवी संगीतकार दया नाईक, प्रसिद्ध गायक बाळू म्हात्रे, स्वर्गीय लोकशाहीर शनी कुमार यांची नात योगिता शेलार आदींनी सहभाग नोंदवला टाळ्या हशा आणि उस्फूर्त नाच नाचून उपस्थित रसिकांनी चर्चासत्राला मनमुराद दाद दिली.

यावेळी बोलताना बिग बॉस फेम दादुस म्हणाले की, स्वर्गीय बाबूनाथ दादा व स्वर्गीय शनी कुमार दादा हे आमचे आदर्श आहेत त्यांच्यामुळेच आणि रसिकांच्या प्रेमामुळेच आज मी आगरी संगीताचा झेंडा साता समुद्रा पार नेऊ शकलो.

शनी कुमार यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी पुढे चाललो घडलो आणि त्यांच्यामुळेच मी आज सुटा बुटात दिसतो आहे, असे प्रसिद्ध गायक जगदीश पाटील यांनी प्रामाणिकपणे कबूल केले.

आलेल्या सर्व मान्यवरांनी लोकशाहीर स्वर्गीय शनी कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिल्या. या चर्चासत्राचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी गीतकार संदेश भोईर यांनी केले आणि लोकशाहीर शनी कुमारांच्या विविध पैलूंचा उलगडा रसिकांना करून दाखवला.

दरम्यान संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पद प्रसिद्ध कवी रामनाथ म्हात्रे तर स्वागताध्यक्ष पद सूप्रसिद्ध कवी चित्रकार मोरेश्वर पाटील यांनी भूषविले. संमेलनाचे दिमाखदार आयोजन आगरी ग्रंथालय चळवळीचे प्रसिद्ध युवा साहित्यिक कवी सर्वेश तरे, प्रसिद्ध गीतकार संगीतकार कवी दया नाईक, सुप्रसिद्ध चित्रकार कवी प्रकाश पाटील, आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार कवी मोरेश्वर पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय आगरी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष सुनील पाटील, रायगड भूषण प्रसिद्ध साहित्यिक एल. बी. पाटील, प्रसिद्ध कादंबरीकार प्रकाश पाटील, प्रसिद्ध साहित्यिक म. वा म्हात्रे, प्रसिद्ध साहित्यिक अविनाश पाटील, प्रसिद्ध कवी साहित्यिक गज आनन म्हात्रे, कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी प. सा. म्हात्रे, प्रसिद्ध कथा कादंबरीकार अरविंद पाटील तसेच मा. आमदार रुपेश म्हात्रे, ज्येष्ठ विधीतज्ञ भारद्वाज चौधरी, मनसेचे स्थानिक अध्यक्ष परेश चौधरी आवर्जून उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा