सिंधुदुर्गवासियांची लापरवाई, की प्रशासनाचा बेजबाबदारपणा….??
विशेष संपादकीय..
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसाला क्वचितप्रसंगी भेटणारा एखादं दुसरा मुंबई प्रवासाचा इतिहास असलेला रुग्ण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून येण्याची परवानगी मिळाल्यावर दिवसाला दुहेरी आकडा गाठणारी कोरोनाग्रस्तांची संख्या हा इतिहास होऊन गेल्या काही दिवसात आजपर्यंत शेकड्यात असणारी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढून हजाराचा टप्पा कधीच पार करून वेगात पुढे जात आहे. गेले काही महिने आपल्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेणाऱ्या जिल्हावासीयांपुढे त्यामुळेच प्रश्न उभा राहिला आहे तो म्हणजे फुगत चाललेल्या कोरोना बाधितांच्या संख्येला जबाबदार कोण?
वर्षातून एकदा येणारा कोकणचा आनंदाचा सण म्हणजे गणेशोत्सव… आणि या उत्साहाने भरलेल्या सणाला देश विदेशातून घरातील नोकरदार, मंडळी आवर्जून येतात. काही लोक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आले नाहीत, परंतु गणेशापुढे कोरोनाला बाजूस सारून लाखो लोक जिल्ह्यात आले. बऱ्याच जणांनी विलगिकरणात काटेकोरपणे राहत आपली व आपल्या गावातील नातेवाईकांची योग्य काळजी घेतली. परंतु *”गृह विलगिकरणात राहिलेल्या काही लोकांनी घरातील इतर कुटुंबियांसोबत मिळून मिसळून राहिल्याने तसेच आपलाच तो, त्याला कुठे कोरोना होणार”* या आपुलकीच्या भावनेमुळे आजपर्यंत बाहेरील व प्रवासाचा इतिहास असणारे रुग्ण भेटत होते त्याला छेद देत स्थानिक रुग्ण सुद्धा झपाट्याने वाढले. त्यामुळे जिल्ह्यात वरवर कोरोनाचे संकट नाही असे दिसणारे चित्र काहीच दिवसात पालटले आणि जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडत गेला.
बेजबाबदारपणे मास्क न वापरता गर्दीत मिसळणे, बाहेरील जिल्ह्यातून आल्यावर घरी न जाता बाजारपेठेत गाडी लावून जाता जाताच खरेदी करणे, अशा चुकीच्या वागणुकीमुळे बाजारपेठेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. पाच दिवसांचे गणपती विसर्जन होताच सावंतवाडीत बाहेरून आलेल्या व हॉटेलचं खायची सवय लागलेल्या चिकन खवय्यांची तर तळ्याकाठी चिकनचे विविध प्रकार भेटणाऱ्या आगळ्यावेगळ्या फूड्स च्या दुकानात मास्क न वापरतात हाफ चड्डीत आपण परगावातून आलेले सुशिक्षित आहोत याचं दर्शन द्यायला सुरुवात केली. त्यात कहर म्हणजे या दुकानाचे कामगार, मालक सुद्धा मास्क न लावता येणाऱ्या ग्राहकांना वस्तू विक्री करतात. रोज संध्याकाळी बाहेर गावच्या पसिंगच्या गाड्या कोणतेही निर्बंध न पाळता चिकणसाठी येतात, खरेदी करून निघून जातात. परंतु जाताना प्रसाद देऊन जातात. *अशा चुकीच्या पद्धतीने वागणारे व्यापारी, आणि आपला तो बाब्या* म्हणणाऱ्या स्थानिक बेजबाबदार लोकांमुळे जिल्ह्यात गावोगावी गणपतीच्या कालावधीत कोरोना बाधितांचा आकडा बेसुमार वाढत आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दुहेरी संख्येत असताना नाके बंद करणारे, भर उन्हात पोलिसांना ठेऊन गाड्या जप्त करायला लावणारे, मास्क नसल्यास,डबल सीट असल्यास २००/- रुपये दंड घेणारे, परप्रांतीयांना बाहेर पडू नये, उपासमार होऊ नये म्हणून धान्य जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारे, पक्षांच्या नावाने थाळ्या देणारे, आणि प्रशासन आज गप्प का? जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा सत्ताधारी शांतच आहेत, तर विरोधीपक्ष मात्र *घंटा नाद* आंदोलन करून मंदिरे उघडण्यासठी प्रयत्नशील आहे. संसद, विधानसभा, शाळा बंद आहेत तिथे मंदिरे उघडण्यासठी प्रयत्न करणे म्हणजे जनतेच्या सुखदुःखाचं काही देणंघेणं नसल्यासारखेच आहे.
जिल्हा प्रशासन कोरोना बाधितांचा नक्कीच योग्य काळजी घेत आहे. मनुष्यबळानुसार आपल्या कामात तत्परता दाखवत आहे. परंतु जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर कोणतीही उपाययोजना होताना, करताना दिसत नाही. बाजारपेठांमध्ये फक्त अनोउन्समेन्ट करून लोक सुधारणार नाहीत, तर गर्दीवर नियंत्रण आणणे गरजेचे असून मास्क न वापरता बाजारपेठेत फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. मास्क न वापरता येणाऱ्या ग्राहकांना सामान न देण्याची व्यापाऱ्यांना ताकीद दिली पाहिजे, तसेच व्यापाऱ्यांनाही मास्क सक्तीचे केले पाहिजे. सोशल डिस्टनसिंगचे काटेकोरपणे पालन होणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक कामासाठी प्रशासन माणूस नेमतात, परंतु त्यांच्याकडून काम होतं की नाही याची कोणीही खातरजमा करत नाही. त्यामुळे *आंधळं दळतय आणि *** अशी प्रशासनाची अवस्था झालेली दिसून येते.
एकंदरीत बेजबाबदार नागरिक आणि बेदखल प्रशासन यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. कोरोनावर विजय मिळवायचा असेल तर प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेणे आणि आपली जबाबदारी पार पाडणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात कोरोनाला सोबत घेऊनच फिरण्याची पाळी कधी येईल हे सांगता येत नाही.