You are currently viewing शहर विकास आराखडा मंजूर होवूनही प्रशासन अनभिज्ञ

शहर विकास आराखडा मंजूर होवूनही प्रशासन अनभिज्ञ

१५ दिवसांत नकाशा उपलब्ध करून नागरिकांच्या हरकती घ्या:अन्यथा काँग्रेस करणार आंदोलन.

मालवण 

मालवण शहर विकास आराखड्या बाबत पुढे कोणती कार्यवाही झाली याची विचारणा करण्यास आज राष्ट्रीय काँग्रेसचे मालवण तालुका शिष्टमंडळ मालवण नगरपालिकेत गेले असता विकास आराखडा नियोजन अधिकारी यांनी मालवण शहर विकास आराखडा मंजूर झाल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याशी फोन वर झालेल्या संभाषणात दिली. याबाबत नगरपालिका अनभिज्ञ असल्याबाबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करत मंजूर झालेल्या शहर विकास आराखड्याचा नकाशा येत्या १५ दिवसात नगरपालिकेत उपलब्ध करावा, तसेच आराखड्यावर जनतेने घेतलेल्या हरकती नुसार आराखड्यात बदल झाले की नाही याची माहिती द्यावी अन्यथा काँग्रेस कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

बहूचर्चित मालवण शहर विकास आराखड्याच्या पुढील कार्यवाही विषयी माहिती घेण्यासाठी आज राष्ट्रीय काँग्रेस मालवणच्या शिष्टमंडळाने मालवण नगरपालिकेत प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सरदार ताजर, आपा चव्हाण, जेम्स फर्नांडिस, गणेश पाडगावकर, योगेश्वर कुर्ले, संदेश कोयंडे, लक्ष्मीकांत परुळेकर, लुईस मेंडीस हेमंत कांदळकर, पराग माणगावकर, महेंद्र मांजरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शहर विकास आराखड्याबाबतचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना सादर करत शहर विकास आराखडा मंजूर झाला की नाही? आराखड्यावर जनतेने ज्या हरकती घेतल्या होत्या त्या मान्य करून आराखड्यात बदल झाले कां ? याबाबतची माहिती मिळावी अशी मागणी केली. यावर मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी विकास आराखडा नियोजन अधिकाऱ्यांना फोन द्वारे संपर्क साधत आराखड्याच्या सद्यस्थिती बाबत माहिती विचारली असता नियोजन अधिकाऱ्यांनी आराखडा मंजूर झाल्याची माहिती दिली. यावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आराखडा मंजूर झाला तर त्याची माहिती नगरपालिकेला कळवली असेलच किंवा त्याचा अहवाल प्राप्त झाला असेल अशी विचारणा मुख्याधिकाऱ्यांना केली. मात्र याबाबत नगरपालिकेकडे कोणतीही माहिती प्राप्त नाही असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगताच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. शहार विकास आराखडा मालवण शहरातील सर्वासामान्य जनतेच्या दृष्टीने महत्वाचा विषय असताना तो मंजूर झाला तरी नगरविकास खाते व नगरपालिका यांच्यात कोणताही समन्वय दिसून येत नाही अशी तिका यावेळी साईनाथ चव्हाण व मेघनाद धुरी यांनी केली.

यावेळी मंजूर आराखड्याचा नकाशा नगरपालिकेस प्राप्त व्हावा अशी मागणी मुख्याधिकारी जिरगे यांनी आराखडा नियोजन अधिकाऱ्यांकडे केली. आराखड्याचा नकाशा येत्या १५ दिवसात प्राप्त व्हावा, अशी मागणी मेघनाद धुरी यांनी करत आराखड्यात जनतेने नोंदवलेल्या हरकतीनुसार बदल झालेले नसतील तर याबाबत काँग्रेस पक्ष आंदोलनाची भूमिका घेईल, असा इशारा दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा