You are currently viewing सावंतवाडी येथे पार पडली वीज ग्राहक संघटना जिल्हा कार्यकारिणीची बैठक

सावंतवाडी येथे पार पडली वीज ग्राहक संघटना जिल्हा कार्यकारिणीची बैठक

*सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्ष श्री.संजय लाड, सचिवपदी श्री.संजय नाईक यांची निवड*

 

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमी उद्भवणाऱ्या विद्युत वितरण बाबतच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता विद्युत वितरण कंपनीकडून समन्वयातून अथवा प्रसंगी दबाव आणून योग्य रीतीने काम करून घेण्यासाठी एखाद्या संघटनेची, जनतेच्या एकजुटीची आवश्यकता भासत होती. विद्युत वितरण कंपनीचे खाजगीकरण झाल्यानंतर वीज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी कंपनीवर कुणाचा तरी वचक असावा यासाठी राज्य विद्युत ग्राहक संघटना संलग्न आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाच्या पाठिंब्यावर सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना स्थापन झाली. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना स्थापन झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यात तालुका संघटना बांधणी सुरू असून जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये तालुका संघटना बांधणी पूर्ण झालेली आहे. शनिवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी सायं. ४.०० वा. सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना बांधणी आणि सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सावंतवाडी नगर परिषदेच्या पत्रकार कक्षाच्या बाजूला असलेल्या हॉलमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना अध्यक्ष श्री.श्रीराम शिरसाट, जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा सचिव श्री.निखिल नाईक, वीज वितरणचे सहाय्यक अभियंता श्री.कोहळे, श्री.लोहार त्याचबरोबर जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री.बाळ तथा गणेश बोर्डेकर, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, श्री. दीपक पटेकर आदी उपस्थित होते.

श्री.बाळ बोर्डेकर यांनी उपस्थित वीज ग्राहकांना सर्वांची ओळख करून दिली तर श्री दीपक पटेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तदनंतर जिल्हा सचिव श्री निखिल नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना का स्थापन झाली? आणि संघटनेचा भविष्यात काय फायदा होईल? व संघटना कशासाठी आवश्यक आहे? संघटनेचा उद्देश काय आहे? याबद्दल थोडक्यात माहिती देत बैठकीला सुरुवात झाली. ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी आपल्या मनोगतातून ग्राहकांचे हक्क, विद्युत वितरण कंपनीने द्यावयाच्या सर्व सुविधा, ग्राहकांच्या असलेल्या समस्या आणि त्याचे निवारण कसे कोण अधिकारी करतील, विद्युत वितरणच्या उच्चपदस्थ कोणत्या अधिकार्यांकडे तक्रार द्यायची? वगैरेबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर विद्युत वितरणच्या सहाय्यक अभियंत्यांच्या उपस्थितीत वीज ग्राहकांच्या समस्या ऐकून घेतल्या. सावंतवाडी तालुक्यातील विविध गावातून आलेल्या सदस्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे अनेक समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने संतोष तावडे ओटवणे यांनी ओटवणे गावासाठी बांदा येथून येणारी वीज वाहिनी वाफोली वगैरे गावांमधून जंगलातून फिरून येत असल्याने ओटवणे गावाला अनेक वेळा वीज खंडित होण्याचा फटका बसत असून माजगाव येथील फिडर मधून वीज मिळावी अशी मागणी केली. त्याचबरोबर प्रलंबित असणारी ही जोडणी वीज वाहिनी जाणाऱ्या वाटेत फॉरेस्ट असल्याने त्यांच्या परवानगी अभावी काम रखडल्याचे विद्युत वितरणचे सहाय्यक अभियंता श्री.कोळी यांनी सांगून लवकरच त्याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. संजय लाड यांनी माडखोल सहित आजूबाजूच्या गावांमध्ये सध्या पावसाळ्याच्या दिवसात उपस्थित होणाऱ्या विजेच्या अनेक समस्या मांडून त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली. श्री.रामचंद्र राऊळ, तळवडा यांनी तळवडे गावात संध्याकाळी सहा वाजता वीज गायब होते ती रात्री दहा वाजल्यानंतर तर कधी कधी पहाटे तीन-चार वाजता येते आणि हे नित्याचेच होत असल्याने त्यावर योग्य तो उपाय करण्याची मागणी केली. श्री.अनिल गोवेकर यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावरून, आंबा बागांमधून जाणाऱ्या वीज वाहिनी नेताना शेतकऱ्यांची संमती घेता का? आणि जर संमती घेत नसाल तर वीज वाहिनीला लागतात म्हणून शेतकऱ्यांची परवानगी न घेता हापूस आंब्याच्या फांद्या तोडण्याचे अधिकार आहेत का? वीज गळती होऊन शेतकऱ्यांच्या बागांमध्ये आग लागते आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते त्याबाबत वीज वितरण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास बांधील आहे की नाही? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देता अशा प्रकारचे चुकीचे काम वीज वितरण कडून होत असल्याचे निदर्शनास आणून देत आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी केली. सावंतवाडी येथील श्री.शिरोडकर यांनी नातेवाईकांच्या जमीनदोस्त झालेल्या जुन्या घरातील वीज खंडित करण्याचा अर्ज दिला असता पडक्या घरात राहणाऱ्या भाडेकरूला घर मालकाची परवानगी न घेता अवैद्यरित्या वीज जोडणी दिल्याची, त्याचप्रमाणे एप्रिल आणि मे महिन्यात श्री.शिरोडकर हे राहत असलेल्या भटवाडी भागात होणारा कमी दाबाचा वीज पुरवठा यामुळे घरातील महागडी उपकरणे नादुरुस्त होण्याचा प्रकार घडत असल्याने एप्रिल मे महिन्यात उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्या बाबत विनंती वजा तक्रार मांडली. जिल्हा व्यापारी संघाचे सदस्य बाळ तथा गणेश यशवंत बोर्डेकर यांनी विद्युत वितरणचे रीडिंग घेणारे कर्मचारी रीडिंग घ्यायला न जाताच “रीडिंग नॉट अवेलेबल” असा शेरा मारून अकारण सरासरी बिल आकारणी करून ग्राहकांना नुकसान पोहोचवत असल्याची बाब विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांच्या ध्यानात आणून दिली. श्री दीपक पटेकर यांनी शहरात विजेच्या खांबांवर आणि तारांवर लोंबकळत असलेली झाडे आणि वेली यामुळे वीज गळती मोठ्या प्रमाणात होत असून सदरचा अधिकार नाहक त्या त्या भागातील विद्युत ग्राहकांच्या माथी मारला जात असून तात्काळ विजेच्या तारा झाडे आणि वेलिंपासून मुक्त करण्याची मागणी केली. श्री राजू उर्फ राजेंद्र सावंत यांनी म्हालटकर पानंद खास्किलवाडा येथील वीज वाहिनी अनेक वेळा झाडे लागून तुटत असल्याने भविष्यात मनुष्यहानी होऊ शकते, त्यामुळे तुटलेली वीज वाहिनी मध्ये जॉईंट न करता संपूर्ण वीज वाहिनी जोडण्याबाबत सुचविले. त्याचं प्रमाणे शहरातील बऱ्याच भागात विद्युत तारांना गार्डींग नसल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त करत २०१५ ची जुना बाजार येथे झालेली पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये याची आठवण करून दिली. उमाकांत वारंग यांनी “आता वीज गेल्यावर पाऊस येणार आहे याची सूचना मिळते” अशी मिश्किल टिप्पणी वीज वितरणच्या कार्य पद्धतीवर केली. त्यावर दीपक पटेकर यांनी देखील पाऊस येण्याची भविष्यवाणी आता वीज वितरण कंपनी करते की काय? असा प्रश्न उपस्थित केला. शहरात वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठा बाबत देखील सर्वांनी आवाज उठविला. विद्युत वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत समस्या मांडत असताना वीज ग्राहकांनी सावंतवाडी शहर विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचारी वर्गाबाबत समाधान व्यक्त करून शहरात वीज पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी वायरमन कडून शक्य तेवढे चांगले प्रयत्न केले जात असल्याचे सांगूण त्यांच्या कामाचे कौतुक केले. वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेत विद्युत वितरण चे सहाय्यक अभियंता श्री.कोहळे यांनी सर्वांच्या समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. शांतपणाने सर्वांच्या प्रश्नाला उत्तरे देत भविष्यात योग्य अशी सेवा देण्याचे आश्वासन दिले.

जिल्हा विद्युत ग्राहक संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्ष व सचिव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यात सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्षपदी माडखोलचे माजी सरपंच संजय भिकाजी लाड व सचिव पदी साटेली येथील सामाजिक कार्यकर्ते संजय अर्जुन नाईक यांची निवड करण्यात आली. सावंतवाडी तालुका अध्यक्षांना सच्चिदानंद बुगडे तळवडा यांनी सूचक अनुमोदन दिले तर सचिव संजय नाईक यांना श्री अनिल गोवेकर धाकोरे यांनी सूचक अनुमोदन दिले. सावंतवाडी येथे पार पडलेल्या वीज ग्राहक संघटना बैठकीसाठी वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा सचिव निखिल नाईक, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, श्री.गणेश यशवंत बोर्डेकर, श्री.उमाकांत वारंग, श्री.दीपक पटेकर,सावंतवाडी विद्युत वितरणचे सहाय्यक अभियंता श्री. कोहळे, श्री.लोहार त्याचप्रमाणे श्री.शिरोडकर, श्री.अनिल गोवेकर, धाकोरा श्री.राजू उर्फ राजेंद्र सावंत श्री.संजय लाड माडखोल, श्री.संजय अर्जुन नाईक, साटेली, श्री.सच्चिदानंद मधुकर बुगडे, तळवडा श्री.रामचंद्र राऊळ, तळवडा श्री.सुनील धोंडी सावंत, कलंबिस्त श्री.संतोष तावडे ओटवणे, विवेक ताम्हणकर, कणकवली, राकेश तांबे, कणकवली आदी वीज ग्राहक उपस्थित होते.

सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना संपूर्ण कार्यकारणी स्थापन करण्यासाठी पुढील बैठक नगरपरिषदेच्या याच सभागृहात शनिवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता घेण्याचे जाहीर करण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांना स्वेच्छेने समाजकार्य म्हणून सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेमध्ये काम करावयाचे असेल त्यांनी आणि वीज ग्राहकांनी आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट जिल्हा सचिव निखिल नाईक जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर तालुकाध्यक्ष संजय लाड, तालुका सचिव संजय नाईक आदींनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा