*कवी चंद्रकांत गायकवाड यांचा पहिला काव्यसंग्रह*
*समीक्षण- डॉ. संतोष पाटील*
*धुळे. ९४२१८९०१३३*
मराठी संत कवींची पाऊलवाट स्वीकारून अभंग या काव्यप्रकारात प्रबोधनात्मक कविता लिहिणारे कवी चंद्रकांत गायकवाड यांचा पहिला काव्यसंग्रह ‘अभंग समतेचा’ हा गंणगोत प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला. कवी चंद्रकांत गायकवाड यांची कविता समाजातील विविध अंगांना स्पर्श करून समाजातील सामाजिक राजकीय अशा क्षेत्रांवर भाष्य करते. समाज मनातील विविध प्रश्नांना कवेत घेऊन त्याच्याविषयी सयंतपणे बदल होण्याची सूचना तथा आवाहन ही कविता करते. वास्तव समाजस्थिती पाहून संवेदनशील कवी मनाचा हा अभंग समतेचा काव्य उद्गार आहे. या काव्याच्या मुळाशी कवी मनाचे अनुभव तथा भावस्थिती असून कवितेतून कवी वैज्ञानिक व मानवी मूल्यांची आवश्यकता लावून धरतात.
अभंग समतेतील कविता म्हणजे समतेचा जागर व बुद्धिवादाचा अंगीकार करायला लावणारी , संविधानिक मूल्यांचा परिपोष करणारी कविता होय. कवी मनाची संविधानिक मूल्यांवर असलेली नितांत श्रद्धा हेच या काव्याचे बीज होय तशेच संविधानिक मूल्यांचा सयंत काव्यात्म आविष्कार रूप म्हणजे या कविता होत. कवी समाजशिक्षकाची भूमिका आत्मनिष्ठ अनुभवांच्या आधारे काव्यातून प्रांजल पणे मांडत आहेत. साहित्य साहित्य असते त्याला विशिष्ट विचारांच्या चौकटीत बसवण्यापेक्षा हे साहित्य प्रबोधन करणारे साहित्य याच प्रकारात बसवावे लागते. कवी कुठेही राग द्वेष संताप व्यक्त करत नाही.आक्रसताळेपणा हा या कवितेचा स्थायीभाव नाही. अन्यायाबाबत एकसुरीपणा मांडणारी ही कविता नाही, तसेच कवी कुठेही अस्वस्थता प्रकट करीत नाही. कवी आपला जीवनानुभव व सामाजिक,राजकीय परिस्थितीचे अवलोकन करून समाजस्थितीवर उपाय कवितेतून मार्गदर्शक विचार सुचवितात. प्रतिगामी मानवी वर्तनाला तात्विक,वैज्ञानिक व संविधानिक मूल्यांच्या आधारे पुरोगामी समाजमन घडवण्यासाठी कवी कवितेतून साद घालतात. साद घालण्याची भाषा ही संतांची भाषा आहे, म्हणून संत कालीन अभंग आणि कवी चंदकांत गायकवाड यांचा अभंग एकाच परंपरेतून पुढे येतात.अभंग या काव्यप्रकारातून व्यक्त झालेल्या कविता विषमतेला झोडून काढतात.
या कविता उपेक्षित, वंचितांची बाजू मांडत नाही , तर अशा परीस्थितीची कारणे दर्शवून त्यांना प्रेरक विचार कवितेतून सांगतात.त्यामुळे असच वर्गाचे आत्मभान जागृत व्हायला मदत होते.कवी मूकपणे अशा परिवर्तनाला बळ देतात. सामाजिक दुफडींवर टीका टिप्पणी नकरता त्या दूर करण्याची कविता विनंती वजा आवाहन करते. म्हणजेच शिक्षक, कवी व माणूस यांचा समन्वय साधून कवी आत्मनिष्ठ अनुभवांच्या आधारे समाज शिक्षकाची भूमिका प्रांजळपणे निभावतात. शिक्षणाशिवाय समाजाला तरणोपाय नाही. शिक्षणाच्या मुळाशी माणुसकी,पर्यावरण, विज्ञान , मानवीय मूल्य व संविधानिक मूल्य असतील, तर समाज प्रगतीकडे जाईल हाच उन्नतीच्या मूलमंत्र लोकसेवक,संत, समाजसेवक ,राष्ट्रपुरुषांनी दिलेला असून हेच विचार या काव्याच्या आधारे कवींनी मांडलेले आहेत.
अभंग समतेचे या काव्यसंग्रहात एकूण 50 कविता असून या कवितेच्याद्वारे निसर्ग,मानव,विज्ञान व समाजस्थिती असा परिवर्तानक्षम चतुष्कोन साधल्याचे लक्ष्यात येते. संतांच्या विचारात मानवाच्या वर्तनाविषयी कुठेही कटुता नसून समाजपरिवर्तनाची इच्छा अभंगाच्या द्वारे समाजापुढे ठेवतात.संतांचा हाच विचार कवी चंद्रकांत गायकवाड यांनी अभंग वृत्ताचा स्वीकार करून विचारांना वाचकांपुढे ठेवतात. अभंग या रचना प्रकाराच्या आधारे छोट्या छोट्या अवकाशात कवी फार विशाल विचार व्यक्त करतात. म्हणून अभंग या कवितेच्या रचना मर्यादा असतानाही गहन आशय व्यक्त करून कविता अभंग आहे. अभंग समतेतील कवितांचे आशय विश्वही असेच विस्तारित आहे. अस्वस्थ मन प्रामाणिकपणे समाजात कवितेच्या माध्यमातून एक दीपस्तंभ हाती घेऊन प्रकाशाची वाट निर्माण करण्याचा एक ध्येयवाद उराशी बाळगताना दिसतं.
या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर जरी नजर टाकली, तरी कवितेतील विचार प्रतिमा समोर दिसते. जणू काही प्रकाशाला पृथ्वीवर आणण्याचं आवाहन ही कविता करीत आहे. आकाशव्यापी विस्तारलेल्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर कंदीलाची आकृती प्रकाशमान होताना दिसते,परंतु हा प्रकाश लाल,तांबूस रंगाचा आहे. हा प्रकाश पेरताना वाट्याला संघर्ष ही येऊ शकतो ही सूचकता कवितेतून प्रतीत होताना लक्षात येते. एवढे मात्र खरे की प्रकाश रक्ताळलेला नाही , तर तांबूस आहे संघर्षाची धार थोडी कमी झालेली आहे.असे असले , तरी मानवी विचार समाजात रुजलेला दिसत नाही म्हणून हा विचार रुजवताना समन्वय महत्त्वाचा आहे. संघर्षाच्या पलीकडे ही विचार करावा लागेल असं हे मुखपृष्ठ बोलके आहे. कंदील रुपी छोट्याशा दीपस्तंभ च्या पलीकडे प्रचंड आकाश गामी अंधार असून या अंधारलेल्या वाटा तुडवताना कवी कवितेचे बोट धरून अंधाराच्या पलीकडे असलेलं
मानवीय सत्य समता,बंधुता,एकता वैश्विकता यावर अभंग विश्वास ठेवतात हे या कवितेचे वैशिष्ट्य नोंदवता येईल. मौलिक व नैतिक मूल्यांना समाजात रुजवण्यासाठी कवी सहज कवितेतून साद घालत असल्याचे लक्षात येते.
अभंग समतेची ही कविता सामाजिक आशयाची व परिवर्तनवादी असल्याचे निदर्शक आहे. कवितेचे आशयविश्व आणि रूपबंध समजून घेताना सुरुवातीला कवी अस्वस्थ होत एवढे प्रगल्भ होतात की पुढे कवितेच्या अंतिम टप्प्यात उपाय सुचवतात. अंधारलेल्या परिस्थितीवर विवेक हाच कसा उपाय आहे याविषयी कवी लिहितात,
शिक्षणाचे मळे
आनंदाचे खळे
भेदूतम जाळे
विवेकाने
(पृ.१३) हे जे जाळे आहे ,हे जाळे अज्ञानाचे आहे हे जाळे भेदायचे असेल, तर विवेकदृष्टी समाजात रुजलीच पाहिजे असा परिवर्तनवादी विचार कवी आपल्या ‘विवेक’ कवितेत नोंदवितात. समाजातील वेगवेगळ्या परिस्थिती न्याहाळताना कवी कधी महानगरीय जीवन तर कधी समष्टीच्या वेदनांना उजागर करतात. ते कृषी चिंतनाला आपल्या कवितेच्या कवेत घेताना सांगतात ,
कामधंदा शेती
वादळाच्या वाटे
पेरलेले काटे
राजकीय
(पृ.१४) शेतकऱ्यांच्या जीवनातील अस्मानीय परिस्थिती आणि सुलतानी विचार कृषी संस्कृतीसाठी कसे घातक ठरत आहेत याविषयी चिंतन मांडतात. त्यासाठी कवी सकारात्मक आशावाद मांडतात,
संतांचे वचन
सत्याचे जतन
कलांचे पतन
करू चला
(पृ.१५) स्वतःसह बदलास सामोरे जाण्याचे आव्हान कृतिशीलपाने करतात. समाजातील दैन्य दुःख त्रास संताप याचे विषयी चीड अत्यंत सयंतपणे व्यक्त करतात.
भासे रम्य वर्षा
मरता बाळे ही
धरणी वांज ही
आम्हासाठी
(पृ.१५) कवी एका समाजाचे प्रतिनिधित्व करताना कल्पनारंजकतेपेक्षा वास्तवाला महत्व देतात. अशा परिस्थितीला बदलासाठी संविधान हेच एकमेव औषध आहे. कारण फुटीरता, धर्मवाद,भाषावाद व प्रांतवाद या जाणिवा वास्तवाच्या काळात प्रखर होत आहेत. म्हणून कवी लिहितो,
उतारा औषध
संविधान जाण
हेची जना दान
भिमराया (पृ.१७)
असा एक विषय नाही की कवितेने आपल्या कवेत घेतला नाही. भटजींचे चातुर्य, कृषीवलांचे मागासलेपण यासाठी माणसाचे जग उभारणे ही वैश्विक पण वेगळी कल्पना कवी मांडतात. माणसांचे गाव उभारू नव्याने पशुचे वागणे नको आता अनंत काळाचा चालत आलेला हा प्रवाह अजूनही माणसं आणि माणुसकी पासून कसा दूर आहे त्यासाठी माणूसकीचे गाव उभारण्याचची तयारी कवी करतात. माणसं पेरणारी ही कविता यशाचे शिखर गाठते. शेतकरी श्रमिकांच्या हालाखीच्या जीवनाबाबत कवी मन अस्वस्थ होते.
काबाडाच्या धनी
मातीत मरतो
तोंडच मारतो
लेकरांचे
राबवून देतो
कळ्यांना सुगंध
जीवनाचा बांध
फोडू नको (पृ.२१)
एवढे कष्ट करूनही शेतकरी जीवन व त्याच्या कुटुंबाची वाताहत आहे त्याला कृषी सर्जनतेचं कौशल्य लक्षात आणून देऊन जीवनाचा बांध फोडू नको (पृ.२१) या विचारातून कृषी आत्महत्या या व्यवस्थेने तयार केलेली एक चुकीची वाट स्वीकारू नको हे सांगण्यासाठी कविता पुढे येते. मानवी जीवनातील श्रद्धास्थाने कमी होत चाललेली असताना माणूस आपापसात देखील द्वेषाने एकमेकांवर तुटून पडत आहे याला कारणीभूत असलेले आर्थिक विषमता भविष्यात तीव्र रूप धारण करेल. म्हणून वेळीच सावध झाले पाहिजे. रोटी या कवितेत कवी आर्थिक विषमतेने ग्रस्त जीवनाचे प्रतिबिंब मांडतात ते लिहितात,
राबत्या देहाची
रोज होती माती
अनीतिच्या वाती
पेटलेल्या ( पृ.२०)
अशा अभावग्रस्त जीवनामध्ये सूर्य त्यांच्या दारी येण्याची मागणी सूर्य या प्रतिमेतून कवी करतात.-शेतकरी-श्रमिकांच्या कष्टाला उजागर करणारी काव्य प्रतिभा कवीत दिसते. तर समाजातील नात्या-नात्यातील भावसंबंधाची समाप्ती होत असल्याने कवी मन चिंतीत होते. आजच्या काळाचे चिंतन समाजाला जागृत करण्यासाठी नाते या कवितेत लिहितात
भाऊ ना भावाचे
वैराचे खोलीत
सुखाला सोबत
सखे भाऊ
अशी अवस्था असल्याकारणाने नातेबंद हा केवळ पोकळ देखावा आहे म्हणून कवी आशावादी विचार पेरताना कवितेच्या शेवटी नैराश्य न मानता नवे नाते आणि नात्यांची घट्ट वीण विणण्याची ग्वाही देतात ते लिहितात
जोडू नवे नाते
गाऊ नवे गाणे (पृ.२३)
नात्याची घट्ट वीण विणण्याची ग्वाही देतात. कर्मवृत्तीची पेरणी ,आर्थिक समतेसाठी तत्पर असलेले मने , कर्मवाद ,ज्ञानाची भूक,संत विचारांची गरज असे प्रकाश पूजक विचार गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , मार्क्स अशा बुद्धीवादी असामान्य व्यक्तिमत्त्वांच्या परिचय कवी आपल्या कवितेतून करून देतात. अशा व्यक्तीचरीत्रपर त्यांच्या कवितेचे आशयाचे वेगळेपण त्यामुळे लक्षात येते. कोणत्याही व्यक्तीने अंध विचार न स्वीकारता त्यामागील कार्यकारणभाव स्वीकारला पाहिजे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक करणारी अभंग समतेची कविता वेगळी ठरते.कवीने यासाठी बौद्ध सुवचनांचा वापर ,मिथकांचा यथोचित समावेश, आलंकारिक भाषेला बुद्धीवादाची दिलेली जोड आणि विरोधालंकाराचा वापर करून पटवून दिलेली वास्तवस्थिती हे कवीच्या कवितेचे विशेष नोंदवता येतील.
माणुसकीचे जे तत्त्वज्ञान या मातीत पेरले त्याच्या उलट या मातीत उगवले. रसदार गर्भात ,पुण्यवंतांच्या संस्कार तरी अशी परस्पर विरोधी परिस्थिती का निर्माण झाली याविषयी कवी चिंतित होतात. त्यामुळे कवी चिलाटी या कवितेत ,
स्वप्न पेरले मी
माती तुझ्या पोटी
उगवली चिलाटी
कशी काय
कसदार कूस
थोर पुण्यवंत
निपजले पुत
असे कसे
(पृ.५७ ) असे ठणकावून सांगतात. कवितेत बऱ्याच ठिकाणी संवादात्मकता येते या संवादात प्रतिमा,प्रतीक, मिथक ,वक्रोक्ती ,म्हणींच्या वापर त्यामुळे काव्यात्म भाषा वाचकांना जवळची वाटते. कवी आपल्या कवितेतून परिस्थितीची सम्यक जाणीव प्रभावीपणे मांडतात. कवीला समाजाशी असलेली नाळ स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळे समाज परिस्थिती जी आहे त्यात बदल करण्यासाठी कवी धडपडतात कारण माणूस समाजाशिवाय पुढे जात नाही. त्यामुळे कवी,
फुलांच्या गंधात
श्वास गुंतलेला (पृ.३५)
असे गहिवर कवितेत लिहितात. समाजातील दांभिकतेवर कवी प्रहारही करतात ,म्हणून कवी शोषणकर्त्या विचारांकडे ही वाचकांचे लक्ष वेधतात. कवी ऐतिहासिक घटना प्रसंगांना कवितेच्या विषय करून तत्कालीन समाजजीवन आणि आजची परिस्थिती यात बदल घडून आणण्यासाठी कवितेला शब्दबद्ध करतात. शाक्य या कवितेत कवी म्हणतात,
शाक्य कुलवंत
पराक्रमी पुत्र..
वारसा संपन्न…
शुद्ध बीजापोटी
येते का चिलाटी ! (पृ.३६)
असे हे सूचक विधान करतात. समाजात अनेक महापुरुषांनी विचार पेरले जीवन अर्पित केलं, तरीही परिवर्तनाची फळ नंतर पिकलीच नाहीत यासाठी कवी मन व्यथित होताना ही दिसते. ‘माहेर” कवितेत नातेबंधातील पोरकेपणा मांडताना कवी
सावता माळ्याची
सुपीक ती माती
वांज नातीगोती (पृ.३७) असे वर्णन करतात.
बुद्ध विचारांचा प्रसार आणि प्रभावाची चुणूक या कविता दाखवितात. शौर्य आणि इतिहासाला उजागर करणारी ही कविता आहे. धर्मांधता ही आजच्या समाजाला लागलेली कीड आहे याविषयी कवी लिहितात , गेला की चोरीला भगवा बसला चकवा विचाराला अशा ठिकाणी कवी बुद्ध विचार हेच दुःखावरचे औषध आहे. कारण बुद्धाच्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन भरलेला आहे त्यामुळे प्रज्ञावंत या कवितेत कवी लिहितात, या कवितेत
तत्व गोडधम्म
ज्या अनुसरून
विज्ञान ते जान
धम्म गाथा
(पृ.३९) गांजलेल्या वृत्ती प्रवृत्तीत नव्या कल्पना सर्वार्थाने रुजवण्याचे काम अभंग समतेतील कविता करीत आहेत. स्त्री आणि स्त्री जीवनाच्या व्यथा या अभंग समतेच्या काव्य गाथा बनल्याचं लक्षात येते. स्वयदीप या कवितेत कवी स्त्रियांच्या जन्माची, त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराची,समाज व्यवस्थेने स्त्रीवर लादलेल्या गुलामीची जाणीव करून देताना सावित्री आणि भिमराया या दोन महान व्यक्ती स्त्रियांवरील अत्याचाराला बिमोड करण्याची दृष्टी-विचारसरणी कशी देतात याविषयी त्यांचा कार्य गौरव केळा आहे. म्हणून कवी स्वतःच दीप होण्यासाठी आधुनिक स्त्रीला साकडे घालतात. दीप हे ज्ञानाचे प्रतीक हेच तुमच्या गुलामगिरी मुक्ततेचे हत्यार असल्याचे निदर्शक आहे. संविधान सर्वांना न्याय देतं म्हणून कवी लिहितात,
गुलामीचे ओझे
माथा भार वाहे
सन्मानाचे दोहे
संविधान
(पृ.४०) असे सूचक विधान करतात. कवी मनावर वारकरी धर्म विचारांचा ही प्रभाव असल्याचे लक्षात येते. वारकऱ्यांची समता कवीला अभिप्रेत आहे. कोणता झेंडा घेऊ हाती मात्र प्रत्यक्ष कृती नाही करती असेच चित्र समाजात आहे. कवीच्या कवितेवरून क्रांतीज्योती महात्मा फुले यांचे विचार व त्यांनी या संदर्भात मानवी कल्याणासाठी स्वीकारलेला रूपबंध अखंडाची आठवण यानिमित्ताने येत असते.
देशाला प्रगतिकडे न्यायचं असेल , तर माणसात माणुसकी पेरायची असेल तर संविधान हेच महत्त्वाचे अस्त्र असल्याचे कवी वारंवार सांगतात. कविता संत विचारातील कालातिकता , कर्मावरूनच माणूस श्रेष्ठ असल्याचे सांगताना कष्टकरी शेतकरी या व्यवस्थेत कसे भरडले जातात, लुटले जातात याचे परिस्थितीजन्य वास्तव चित्रण अभंग समतेची कविता करते. निसर्ग आणि निर्माता या दोन शक्तींवर कवींचा विश्वास असल्याचेही या कवितेतून लक्षात येते. लोकशाहीची राजककारण्यांनी चालवलेली थट्टा कवी चिंतनाचा विषय आहे. नेते (पृष्ठ ५३) या कवितेत कवी राजकीय दांभिकतेवर संयंतपणे प्रहार करतात. लोकशाही व्यवस्था, मतदानाचे महत्त्व राष्ट्र उभारणीसाठी कसे महत्त्वाचे आहे याची चुणूक ही कविता दाखवीते. नेत्यांचे देवत्व करण करणे संसदेसाठी धोक्याचे असल्याचेही कवी जाणीव करून देतात.
“नटवा रे भूमी
आचार सिंचन
सोहळा सन्मान
जीवनात”
(पृ,५६) भारत भूमीला बदलाचे स्वप्न कविता दाखवते.
प्रखर राष्ट्रवाद, समता ,प्रेम, निसर्ग प्रेम, बुद्ध विचार ,वैज्ञानिक दृष्टिकोन, शेतकरी-कष्टकरी, कामगारांच्या व्यथा वेदना, माणसावर असलेली श्रद्धा आणि त्याच्यावरची आस्था याची परिभाषा देणारी कविता चंद्रकांत गायकवाड यांच्या कवितेने कवेत घेतली आहे. परस्पर विरोधी परिस्थितीला काव्यबद्ध करताना प्राचीन समाज , आजचा समाज व आजची वास्तविकता याचा काव्यात समन्वय साधून परिवर्तनासाठी कविता सज्ज असल्याचे लक्षात येते. बदलत्या मानवी वर्तनाच्या आणि मूल्यांच्या परिप्रेक्षात कवितेला आणणारे कविमन कवितेच्या आशियातून व्यक्त होते. कवी अस्वस्थता प्रकट करताना प्रतिगामी परिस्थितीवर उपाय सुचवून कवितेला उंचीवर नेतात. संविधानिक मूल्यांवरची श्रद्धा आणि बुद्धिवाद या कवितेचे बलस्थाने आहेत. कवी कवितेतून समाजशिक्षकाची भूमिका आत्मनिष्ठ अनुभवातून मांडताना दिसतात. कवितेचे भाषा सोपी सुलभ व आकलनक्षम असून कविता सुविचार आणि सुभाषितांच्याकडे जाणारी आहे. अभंग या काव्यप्रकारातून कवी प्रतिभा कुठेही अडखळत नाही. कवितेला कृत्रिमतेचा स्पर्श होत नाहीन तर कवीता स्वाभाविक आणि सर्जनशीलपणे पुढे जाते. साहित्याच्या परिवर्तनवादी प्रवाहात अभंग समतेचे कविता वेगळे स्थान निर्माण करणार यात शंकाच नाही.
समीक्षण
डाॕ.संतोष पाटील
शिरपूर जिल्हा धुळे
संपर्क: ९४२१८९०१३३
*संवाद मिडिया*
*रक्त तपासणी व स्ट्रेस टेस्ट*
*~4050~ ची तपासणी फक्त 899 मध्ये*
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
*हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस, मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा, अँजिओग्राफी, अॅन्जिओप्लास्टी, आणि बायपास केलेल्या रुग्णांसाठी*
*रक्त तपासणी व स्ट्रेस टेस्ट*
*~4050~ ची तपासणी फक्त 899 मध्ये*
*रविवार दि. 20 ऑगस्ट 2023 वेळ : स. 8 ते स. 11.00 वा.*
*खालील रक्त तपासण्या केल्या जातील*
*डायबेटिस* *(Diabetes Profile)HbA1C*
*कोलेस्ट्रॉल (Lipid Profile)*
*किडनी(Kidney Function Test)*
*लिव्हर (Liver Function Test)*
*थायरॉईड (Thyroid Stimulating Hormone) ( TSH)*
*स्ट्रेस टेस्ट तपासणी*
*स्ट्रेस टेस्ट हे एक गोल्ड स्टँडर्ड इन्वेस्टिगेशन आहे. आणि* *तुमच्या हृदयाची कार्यक्षमता लक्षात येते. हृदयाला रक्त पुरवठा सुरळीत चालू आहे की नाही हे लक्षात येते. हृदयाचा रक्तपुरवठा ब्लॉकेज सारख्या त्रासाने अडत असल्यास ते तपासणीमध्ये कळते*
*टिप- उपाशी पोटी सॅम्पल देणे आवश्यक आहे. नाव नोंदणी आवश्यक*
*नाव नोंदणी आवश्यक माधवबागच्या खालील शाखेशी संपर्क साधा*
*कणकवली – 9373183888*
*कुडाळ – 9011328581*
*सावंतवाडी – 7774028185*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*