You are currently viewing वाढीव वीजबिलाची होळी, रास्तारोको, पोलीस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट…

वाढीव वीजबिलाची होळी, रास्तारोको, पोलीस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट…

मुंबई :

 

वाढीव वीजबिल माफीसाठी आज राज्यभरात ठिकठिकाणी भाजपने आंदोलन छेडलं आहे. मुंबईत कांदिवलीमध्ये भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा देत, रास्तारोको करत वाढीव वीजबिलाची होळी करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो भाजप कार्यकर्ते सोबत महिलांचा ही सर्वाधिक सहभाग होता. आंदोलकांनी हातात भाजपचे झेंडे घेऊन जोरजोरात घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

 

यावेळी आंदोलकांनी सरकारचा निषेध म्हणून रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करत चक्काजाम केला. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यानंतर या आंदोलकांनी वीज बिलाची होळी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना पांगवता यावं म्हणून पोलिसांनी अतुल भातखळकर यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे आंदोलक जास्तच चवताळल्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट होऊन वातावरण अधिकच तापले.

 

भातखळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समता नगर पोलीस ठाण्यात आणले. त्यामुळे आंदोलकांनीही समता नगर पोलीस ठाण्याच्या दिशेने मोर्चा वळवला असून पोलीस ठाण्याला घेराव घातला आहे. जोपर्यंत भातखळकरांना सोडण्यात येणार नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्याबाहेरून हटणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलकांनी पोलीस ठाण्याबाहेरच घोषणाबाजी सुरू केली आहे. त्यामुळे समता नगर पोलीस ठाण्याबाहेरही तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा