You are currently viewing आपल्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आई – वडील व शिक्षकांना विसरू नका – ज्ञानेश्वर म्हात्रे

आपल्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आई – वडील व शिक्षकांना विसरू नका – ज्ञानेश्वर म्हात्रे

वेंगुर्ले :

पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी व शिक्षणासाठी काम करीत आहेत. आज सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात राज्यात अग्रेसर आहे. कोकणचा विकास होणे आवश्यक असून आपल्या शैक्षणिक क्षेत्राचा विकास करावयाचा असेल तर उपलब्ध सुविधांचा योग्य उपयोग करून घ्या. “आपल्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आई – वडील व शिक्षकांना विसरू नका”. वाईट गोष्टींमध्ये न गुरफटता योग्य मार्ग निवडून आपल्या व देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी वेंगुर्ले येथे आयोजित कार्यक्रमात केले.

 

भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील दहावी – बारावी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा व शालांत परीक्षेमध्ये १०० टक्के निकाल लागलेल्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय  मुख्याध्यापकांचा वेंगुर्ले स्वामिनी मंडपम येथे सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री.म्हात्रे बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन श्री.म्हात्रे यांच्या हस्ते झाले. सर्वप्रथम श्री.म्हात्रे व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

 

व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हाध्यक्ष व माजी आ. राजन तेली, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जेष्ठ नागरिक संघाचे शामराव काळे सर, मुख्याध्यापक संघाचे तर्फे सर, सचिव गुरुदास कुसगावकर, प्रदीप शिंदे, बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर, एम.जी. मातोंडकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, सरपंच संघटनेचे पप्पू परब, खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, महीला मोर्चाच्या सारीका काळसेकर – प्रार्थना हळदणकर – रसीका मठकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, माजी सरपंच मनोज उगवेकर, नितीन चव्हाण, विजय रेडकर, किसान मोर्चाचे प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु, युवा मोर्चाचे समीर नाईक व हेमंत गावडे, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, सत्यवान परब, दिलीप परब, नंदा गावडे, संदिप देसाई आदी उपस्थित होते. प्रभाकर सावंत, राजन तेली यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील १० वी १२ वीतील ११६ गुणवंत विद्यार्थांचा तसेच २० मुख्याध्यापकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी व वसंत तांडेल यांनी आभार मानले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा