लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांचे आंदोलन मागे
सावंतवाडी
आसाम मधील तंज्ञ बोलावून तिलारी खोऱ्यात असलेले हत्ती हाकवण्यात येतील तसेच नुकसान भरपाई वाढवून देण्यासंदर्भात लवकरच शासन अध्यादेश काढण्यात येईल. हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती बैठक लवकरच मंत्रालयात घेतली जाईल, असे लेखी आश्वासन वन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर दोडामार्ग मधील ग्रामस्थांनी येथील वनविभाग कार्यालयासमोर मांडलेले ठिय्या आंदोलन तब्बल ६ तासानंतर मागे घेतले.
यावेळी शिंदे गट व भाजपा यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला तर दुसरीकडे संतप्त झालेले शेतकरी पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. मात्र गरमा गरम चर्चेअंती मंत्री दीपक केसरकर यांनी वन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लेखी आश्वासन देऊन या प्रश्नावर तोडगा काढला. त्यानंतर आंदोलन माघारी फिरले. सकाळ पासून आंदोलन संपेपर्यंत त्या ठिकाणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली ठाण मांडून बसले होते. त्यांनीही वनमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी पंकज गवस, विष्णू देसाई, सुजाता मणेरीकर, रामकृष्ण मणेरिकर, संतोष गवस, ज्ञानेश्वर चिरमुरे, आप्पा गवस, देविदास गवस, मिलिंद सावंत, गुरुदास देसाई, रवींद्र देसाई, दाजीबा देसाई, गोपाळ देसाई, महेंद्र देसाई, दयानंद सावंत, तानाजी सावंत, आनंद शेटकर, समीर देसाई, अनंत देसाई, मनोहर गवस, सखाराम गवस, रमेश गवस आधी ग्रामस्थ उपस्थित होते.