You are currently viewing महामार्ग कोकणी माणसामुळे नव्हे तर प्रशासनामुळे रखडला – परशुराम उपरकर

महामार्ग कोकणी माणसामुळे नव्हे तर प्रशासनामुळे रखडला – परशुराम उपरकर

कणकवली

मुंबई गोवा राष्‍ट्रीय महामार्गाचे काम गेले चौदा वर्षे रखडले आहे. याला कोकणी माणूस नव्हे तर प्रशासन जबाबदार आहे अशी टीका मनसे नेते परशूराम उपरकर यांनी आज केली. महामार्ग चौपदरीकरण कामाची गडकरींनी हवाई पाहणी केली. त्‍याऐवजी ते महामार्गावर आले असते तर त्‍यांना वस्तुस्थिती समजली असती असेही ते म्‍हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्ग कोकणी माणसामुळे रखडला असल्‍याचे म्‍हटले होते. त्‍यावर बोलताना श्री.उपरकर म्‍हणाले की, महामार्ग रखडण्याला कोकणी माणूस जबाबदार आहे हे गडकरींचे विधान अत्‍यंत चुकीचे आहे. यातून कोकणी माणसाची बदनामीच होत आहे. या मागील वस्तुस्थिती समजण्यासाठी गडकरींन हेलिकॉप्टर दौरा करण्याऐवजी महामार्गावरून गाडीतून फिरावे म्‍हणजे त्‍यांना वस्तुस्थिती समजेल.
ते म्‍हणाले, महामार्ग रखडण्याला प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा आणि सक्षम ठेकेदार नसणे ही महत्‍वाची कारणे आहेत. महामार्ग बाधितांना वेळेत भूसंपादन मोबदला देण्यात आला नाही. त्‍यांचे अनेक प्रश्‍न अधिकाऱ्यांनी प्रलंबित ठेवले होते. तर कार्यक्षमता नसताना ठेकेदारांना कंत्राटे देण्यात आली. त्‍यामुळे महामार्गाची रखडपट्टी सुरू राहिली आहे. त्‍यामुळे विनाकारण कोकणी माणसाला दोष देऊ नये.

प्रतिक्रिया व्यक्त करा