You are currently viewing सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

*सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

केदारनाथ शाळा नेहरूनगर कुर्ला पूर्व येथे संकल्प संस्था आणि मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर २०२३’ चे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन केदारनाथ शाळेचे अध्यक्ष विनय रानडे आणि प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटक सविता कुराडे (अधिक्षिका, आशा सदन बालिकाश्रम, डोंगरी, मुंबई) यांच्या हस्ते तसेच या प्रशिक्षण शिबिराचे आयोजक विनोद हिवाळे अध्यक्ष संकल्प संस्था आणि सूरज भोईर अध्यक्ष मैत्री संस्था यांच्या उपस्थितीत पार पडला.

विनोद हिवाळे यांनी शिबिराची प्रस्तावना केली. पहिल्या सत्रामध्ये सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा मुख्य हेतू सामाजिक कार्य करण्यासाठी कार्यकर्ता घडवणे, त्या कार्यकर्त्याला समाजातले सामाजिक प्रश्न काय आहेत याची जाणीव करून देणे, ते प्रश्न सोडवताना सामाजिक कार्यकर्ता म्हणून कुठले गुण असावेत, कार्यकर्त्याचे तत्व काय आहे, मूल्य काय आहे, कार्यकर्ता म्हणून कोणते संविधानिक कार्य कसे करावे, संवाद कौशल्य, लेखन कौशल्य, गटकार्य, नेतृत्वगुण, विविध मानवी अधिकारांबद्दलची माहिती, महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणा तसेच खेळाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींचा स्वपरिचय, प्रशिक्षण देण्याचा उद्देश, संस्था परिचय, कार्यकर्त्याची भूमिका या विषयाचे सादरीकरण केले.

प्रमुख पाहुणे विनय रानडे यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रशिक्षणार्थींना सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पूर्ण करून कार्यकर्ता खऱ्या अर्थाने समाजाच्या विकासाचा दृष्टीने कार्य करण्यास प्रेरित होईल असे मार्गदर्शन करून कार्यक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सुरज भोईर यांनी आपल्या मधूर आवाजात चळवळीची गाणी गायली सर्व प्रशिक्षणार्थींनी त्यांना सुरेल साथ दिली.

दुसऱ्या सत्रामध्ये सविता कुराडे यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर अतिशय सुंदर मांडणी केली. महिला सक्षमीकरण म्हणजे काय, महिलांनी स्वतःची जबाबदारी ओळखून प्रत्येक समस्येला कसे तोंड द्यावे याबाबत विविध उदाहरणे देऊन खूप मोलाचे मार्गदर्शन केले.

तिसर्‍या सत्राचे वक्ते श्रीनिवास सावंत यांनी सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्य म्हणजे काय? त्यांचा इतिहास, चळवळ कार्यकर्ता, त्यांचे मूल्य, तत्व यावर अतिशय सोप्या भाषेत सर्वांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल क्षीरसागर यांनी केले. शिबिराच्या पहिल्या दिवसाची सांगता आणि आभारप्रदर्शन संकल्प संस्थेच्या सचिव सविता हेंडवे यांनी केले. संपूर्ण शिबिर सुनियोजित पद्घतीने पार पाडण्यासाठी संकल्प संस्थेच्या खजिनदार अरुणा मोरे, मैत्री संस्थेचे साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर, रामभाऊ यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा