*सावंतवाडी मच्छी मार्केट मधील विक्रेत्या महिला आक्रमक*
*मासळी बाजाराच्या बाहेर व शहरात इतरत्र होणाऱ्या मासे विक्रीमुळे मार्केटमध्ये मच्छी विकणाऱ्या महिलांची नाराजी*
सावंतवाडी शहरात सुसज्ज असे मच्छी मार्केट उपलब्ध असून मच्छी विक्रेत्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सावंतवाडी नगर परिषदेने नवीन मच्छी मार्केट उभारल्यानंतर मच्छी विक्रेत्यांना ओट्याच्या आकाराप्रमाणे नगर परिषदेचा कर लावलेला आहे. सावंतवाडी मासळी मार्केटमध्ये जास्त प्रमाणावर मासे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना सदरचा नगरपरिषदेचा कर देणे शक्य होते, परंतु एखादी टोपली आणणाऱ्या विक्रेत्यांना ओट्याचा कर देणे परवडत नसल्याने काही विक्रेत्या महिला मासळी बाजाराच्या बाहेरील पार्किंगची जागा, वाघ पाणंद, सावंतवाडी एसटी स्टँड, गोविंद चित्र मंदिर, नाट्य मंदिर, सुर्वे दवाखान्या जवळ, सालईवाडा टेलिफोन भवन आदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर मासे विक्री करताना आढळून येतात. सावंतवाडी एस टी स्टँड परिसर तर मिनी मासळी बाजार झाला आहे. त्यामुळे सावंतवाडी मासळी बाजारातील चित्र पाहिले असता बाजारात ग्राहकांची मांदियाळीच दिसून येते. परिणामी हजारो रुपये खर्च करून मालवण, वेंगुर्ले, निवती, शिरोडा आदी परिसरातून आणलेल्या मासळीचा खप कमी होतो. त्यामुळे मच्छी विक्रेत्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते.
सावंतवाडी नगर परिषदेने मोठा गाजावाजा करून “महाराष्ट्रातील पहिले सुसज्ज असे मासळी मार्केट” अशा वल्गना करत तळमजल्या सहित तीन मजल्याचे मासळी मार्केट उभे केले. सुरुवातीपासूनच मासळी मार्केटचा स्लॅब कोसळणे वगैरे प्रकाराने सदरचे मासे मार्केट वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. परंतु त्यानंतर सुसज्ज व सर्व सोयीने युक्त अशा मासे मार्केटचा शुभारंभ झाला आणि अवघे काही दिवस मासे मार्केटचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत सर्वदूर सावंतवाडी मासे मार्केटचे नाव पोचले. सावंतवाडी मासळी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्या महिलांना मासे ठेवण्यासाठी ओटे, प्रत्येकी पाण्याचे कनेक्शन सोबत सिंक, वीज कनेक्शन, फॅन, मासे ठेवण्यासाठी ओट्यांच्या खाली वेगळी जागा अशा विविध सुविधा पुरविण्यात आल्या. पहिले काही दिवस सर्व सुविधांचा लाभ घेत मासळी विक्रेत्यांनी मासे विकण्यास सुरुवात केली. परंतु गेल्या काही वर्षात ओट्यांवर मासे विक्री होत नाही असे कारण देत त्यातीलच काही महिलांनी ओट्यावर न बसता ओत्याच्या समोरच माशांचे ट्रे लावून मासे विक्री करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे मार्केटमध्ये चालणाऱ्या ग्राहकांना देखील चालायला जागा राहिली नाही. काही मासे विक्रेत्या महिला ग्राहक चालत असताना देखील मधल्या पॅसेज मध्ये ट्रे मधील माश्यांचे घाण पाणी ओततात त्यामुळे चालणाऱ्या ग्राहकांना त्याचा त्रास होतो. मासे बाजारात मासे विक्रेत्या काही महिलांची सुरू असलेली ही दादागिरी पाहूनच अनेक ग्राहकांनी रस्त्यावर विक्री होत असलेल्या मच्छी विक्रेत्यांकडे मासे घेणे पसंत केले. परंतु याचाच फायदा घेत संपूर्ण सावंतवाडी शहराचा या मासळी विक्रेत्या महिलांनी आणि सावंतवाडी नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मासळी बाजार केल्याचेच निदर्शनास येत आहे. सावंतवाडीत सुसज्ज मासळी मार्केट असूनही मासळी मार्केटच्या खाली पार्किंगच्या जागेमध्ये सावंतवाडीतील एक स्थानिक महिला मासे विक्रीसाठी गेले अनेक महिने बसत होती, त्याच महिलेच्या शेजारी गेल्या काही दिवसापासून वेंगुर्ला येथील दुसरी महिला मासे विक्रीसाठी बसू लागली. मासे मार्केटमध्ये बसल्यावर कट्ट्याचा कर द्यावा लागतो आणि मासे मार्केटच्या बाहेर कर्मचाऱ्यांच्या हातावर थोडेफार पैसे टेकवले तरी मासे विक्री करता येतात. त्यामुळे कर भरून मासे मासळी मार्केटमध्ये विक्री करणाऱ्या महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी मासे मार्केटच्या बाहेरील पार्किंगच्या जागेत ट्रे लावून मासे विकण्यास सुरुवात केली.
सावंतवाडी शहरात सुसज्ज असे मासे मार्केट असूनही मासळी मार्केटच्या बाहेर पार्किंगच्या जागेत, वाघ पाणंद ,हॉटेल मॅंगोच्या मागील स्लॅबवर, विठ्ठल मंदिर रोड, सावंतवाडी एसटी स्टँड समोर, गोविंद चित्र मंदिर, गोविंद नाट्य मंदिर, सुर्वे दवाखाना, सालईवाडा टेलिफोन एक्सचेंज जवळ अशा विविध ठिकाणी मासळी विक्रेते बसत असल्याने सावंतवाडी शहराचेच मासळी मार्केट झाल्यासारखेच चित्र शहरात येणाऱ्या लोकांना, पर्यटकांना दिसत आहे. मासळी मार्केटच्या पायऱ्या समोर भाजी विक्रेते बसत असल्याने मासळी मार्केटच्या पायऱ्या चढून जाणे देखील ग्राहकांना मुश्किलीचे होत आहे. नागरिकांना होणाऱ्या या त्रासाला सर्वस्वी सावंतवाडी नगरपालिका प्रशासन जबाबदार असून सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाने शहराकडे केलेल्या दुर्लक्षामुळेच सावंतवाडी शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे दिसून येत आहे. सावंतवाडी नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासक म्हणून मा.प्रांताधिकारी यांनी सदर बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी सावंतवाडीतील सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.