आज ‘बेस्ट दिन’ तरीही मुंबईकरांच्या त्रासात भर
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे प्रवासी बेस्ट बसेस कडे वळले; मात्र भाडेतत्त्वावरील १,६७१ बसेस पैकी ७०४ बसेस बस आगारात उभ्या राहिल्याने मेगाब्लॉकचा त्रास त्यात कंत्राटी कामगारांचा संप यामुळे प्रवाशांना रविवारी गैरसोयीला सामोरे जावे लागले.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमातील कायमस्वरूपी चालक व वाहकांना भाडेतत्त्वावरील बसेस चालवण्यास दिल्या असता मालाड येथे कंत्राटी कामगारांनी अडवणूक केली. त्यामुळे मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार केली असता, मालवणी बसडेपो बाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहणार, अशी भूमिका कंत्राटी कामगारांनी घेतल्याने सोमवारी ७ ऑगस्ट ‘बेस्ट दिनी’ मुंबईची कोंडी होणार आहे.
पगारवाढ, मोफत बेस्ट बस प्रवास, कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करणे, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भाडेतत्त्वावरील बसेसचा पुरवठा करणाऱ्या मातेश्वरी, डागा ग्रुप, हंसा, टाटा कंपनी, ओलेक्ट्रा स्विच मोबॅलिटी या कंपन्यांतील कंत्राटी चालक व वाहकांनी बेमुदत संप सुरू केला आहे. रविवार संपाचा पाचवा दिवस, कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत कुठलाही तोडगा न निघाल्याने संपकरी संपावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सोमवारी कुलाबा बेस्ट भवन येथे बसेसचा पुरवठा करणान्या कंपन्या, संपकरी कंत्राटी कामगारांचे प्रतिनिधी व बेस्ट उपक्रम यांच्यात बैठक होण्याची शक्यता असून, दुपारपर्यंत काही तोडगा निघेल, असे सांगण्यात येते.
कंत्राटी कामगारांबरोबर बेस्टचा संबंध नाही, असे बेस्ट उपक्रमाकडून शनिवारी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले ते चुकीचे आहे. आमच्या रास्त मागण्या असून, कायद्याने त्याची पूर्तता करणे अपेक्षित आहे. अद्याप तरी राज्य सरकार व बेस्ट उपक्रमाकडून बैठकीसाठी बोलवण्यात आले नाही. मात्र आमच्या मागण्या योग्य असून त्यांची पूर्तता करण्यात यावी, असे संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.
*एसटीच्या १५० गाड्या प्रवाशांच्या सेवेत*
कंत्राटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाकडे १५० गाड्यांची मागणी केली असता १५० गाड्या उपलब्ध झाल्या. शुक्रवारी संध्याकाळपासून प्रवासी सेवेत चालवण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
*मालवणी बस डेपोबाहेर पोलीस बंदोबस्त*
कंत्राटी कामगारांनी बेमुदत संप पुकारल्याने भाडेतत्वावरील बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर आणल्या आहेत. बेस्ट उपक्रमातील कायमस्वरुपी चालक व वाहक भाडेतत्त्वावरील बसेस चालवत असल्याने कंत्राटी कामगार त्यांना रोखून धमकावत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर या घटनेबाबत मालवणी पोलीस ठाण्यात रीतसर लेखी तक्रार करण्यात आली असून या तक्रारी नंतर मालवणी पोलीस ठाण्यातर्फे मालवणी आगाराच्या द्वाराजवळ दोन पोलीस गाड्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर मालवणी आगारातील बस गाड्या प्रवर्तित करतेवेळी कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
*काय आहेत मागण्या*
> बेस्ट उपक्रमाचे कामगार घोषित करून त्यांना कायम कामगारांच्या सर्व सेवाशर्ती लागू करून सोयीसुविधा द्या.
> समान कामाला समान वेतन या न्यायतत्त्वाप्रमाणे वेतन त्वरित देण्यात यावे.
> भाडेतत्त्वावर बस देणारा कंत्राटदार बदलला तरी सेवेचे सातत्य कायम राखावे.
> बेस्ट उपक्रमाच्या सेवेत कायम करण्यात यावे.
> सापत्न वागणूक न देता, मोटर ट्रान्सपोर्ट कामगार कायद्यात नमूद सर्व सोयीसुविधा देण्यात याव्यात.