You are currently viewing सुसंवाद

सुसंवाद

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अंजली दीक्षित-पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*सुसंवाद*

 

काय आज आपण खरंच संवाद हरवत चाललो आहोत? फक्त आभासी जगातच वावरताना लाईक, कमेंट, इमोजी, फॉलोवर्स यांच्या मोहजालात अडकून बसलो आहोत? कधी असं वाटतं का की खूप दिवस झाले मुलांना जवळ घेऊन त्यांच्या गप्पा गोष्टीत मी स्वतःला विसरून गेलो? कधी असं वाटतं का की बायको सगळं आपल्या हातात देते, सामान आणायला आपण तिच्याबरोबर जातो, घरी येतो, झोपतो ऑफिसला जातो… दिवस चालले महिने वर्ष चाललीत पण आतून कुठेतरी ओढ विरळ होत चालली आहे? कधी असं जाणवतं का की नवरा ऑफिसमधनं घरी येतो, टीव्ही बघतो, चहा पितो, आपण एकत्र जेवतो, शॉपिंगला जातो, वीकेंडला जातो, पुन्हा सोमवार ते शुक्रवार तेच रुटीन त्याच भाज्या तीच दळण पण हे सगळं यंत्रवत होत चाललंय? जवळ राहण्याऱ्यांची ही कथा तर जे आई-वडिलांपासून, भावंडांपासून लांब राहतात ते किती कनेक्टेड राहत असतील? शेवटचा फोन थकलेल्या आई-वडिलांना कधी केला होता आपण स्वतः, हे सहज आठवते की डोक्याला फार त्रास द्यावा लागतो? हे असं सगळं चित्र रुक्ष रुक्ष वाटत नाही का? काहीच ओलावा नसलेलं असलं चित्र कुणी बरं रंगवलं असावं? खरंच आपल्याला बोलायला मन मोकळं करायला इतका त्रास होतोय? इतका विचार करावा लागतोय की आता असं मन मोकळं करणं हा प्रकारच इतिहास जमा होत चाललाय. आता हेच चित्र पहा काही समवयस्क मित्रमंडळी किंवा फार तर नातेवाईक म्हणा काही कार्यानिमित्त एकत्र जमलेले आहेत. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या आघळपघळ गोष्टी झाल्या की आधीपासूनच हातात असलेल्या मोबाईलवर सरफिंग सुरू होतं. मग कुठल्यातरी दूरस्थ परिचिताशी चॅटिंग, कधी ऑफिसचं काम कधी गेम्स असे काही काही उद्योग सुरू असतात. समोर माणूस बोलत असतो त्यालाही आपण एकीकडे मान डोलवत असतो. हो हो, नाही, अरेच्चा.. असे काहीतरी उद्गारवाचक शब्द आपल्या मुखातून बाहेर पडत असतात. पण त्यात अजिबातच जीव नसतो. शाळेतून घरी आलेल्या पिल्लांबरोबर बोलताना सुद्धा एकीकडे मोबाईलवर अविरत बोट फिरवतच असतो आपण. खरंच एक दहा पंधरा मिनिटे सुद्धा आपण त्यांच्या डोळ्यात डोळे घालून, समोर बसून शांत चित्तानं त्यांचं म्हणणं त्यांच्या विश्वातल्या घडामोडी गमतीजमती राग द्वेष रुसवे फुगवे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहोत का? इतकं अर्जंट आणि महत्त्वाचं असं कुठलं काम असू शकतं की जे त्या क्षणी नाही केलं तर काहीतरी अनर्थ ओढावणार आहे.

खरंतर हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की असं इतकं महत्त्वाचं आणि अर्जंट काहीही नसतंच. निदान रोज रोज तरी नसतंच. खर आहे ना? मग का बर आपण या गोष्टी टाळू शकत नाही? कारण आपण ती सवय लावून घेतली आहे स्वतःलाच. काय गरज आहे ते रिकामटेकडे रील्स, स्टेटस आणि अपडेट्स बघायची? आपल्याला कोणी किती लाईक केले, कुणी काय कमेंट केले हे बघून त्यावेळेपुरतं जरी समाधान आनंद वाटत असला तरी तो आनंद चिरकाल टिकणारा नाही हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे.

मान्य आहे की हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. माहिती असणं आणि करून घेणं हे खूप आवश्यक तर आहेच आणि तो आपला हक्क देखील आहे. या माहितीच्या महापुरात अक्षरशः आपण वाहून जाऊ की काय अशी भीती वाटते, इतका सगळ्या बाजूंनी माहितीचा भडीमार होत असतो. त्यातली आवश्यक माहिती किती आणि टाकाऊ कचरा किती हे ज्याचं त्यानं ठरवायचं. पण काय फायदा अशा माहितीचा की जिथं आपल्या बायकोच्या मनात काय आहे किंवा तिला काय दुखतय हे नवऱ्याला ओळखता येत नसेल तर? बरं ओळखायचं जाऊ दे पण जर का सुसंवाद असेल तर बऱ्याच गोष्टींचा बोलून सुद्धा निचरा होत जातो. काय उपयोग अशा माहितीचा जर मानसिक आधारासाठी तुमची मुलं बाहेरच्या स्त्रोतांवर अवलंबून राहायला लागली तर? तुम्हाला त्यांच्याशी फ्रेंडली बोलता वागता नाही आलं तर त्यांच्या विश्वातल्या खळबळ जनक गोष्टी सुद्धा ते तुम्हाला सांगणार नाहीत. आजकाल अगदी शाळकरी वयातल्या मुलांपासून जे व्यसनाधीनतेच प्रमाण वाढलेलं दिसतं याच्यामागे दुरावत चाललेले नातेसंबंध आणि नाहिसा झालेला कौटुंबिक सुसंवाद हेच कारण दिसतं. पुष्कळ प्रमाणात पैसा काही लोकांच्या हातात आहे पण त्याची किंमत नाही आणि दुसरीकडे अतिशय दारिद्र्यात आणि रोजच्या जगण्याच्या विवंचनेत खितपत पडलेली बेरोजगार जनता आहे. पण दोन्हीही परिस्थितीत एक चित्र अगदी कॉमन आहे ते म्हणजे मोबाईल आणि इंटरनेटचा कमालीचा वाढलेला गैरवापर. त्यामुळेच गुन्हेगारीचे अनेक नवीन फंडे समोर येताना दिसतात. आज इंटरनेटवर सगळं काही उपलब्ध आहे जे तुम्ही मागाल ते तुम्हाला बघायला मिळतं पण त्यामुळे वागण्याबोलण्याचं ,आचारविचारांचं ताळतंत्र बिघडत चाललय त्याच्या परिणामांचं काय? आज आपली कितीही इच्छा असली तरी साधे आणि अक्षरशः बाळबोध वाटणारे संस्कार मुलांवर करायचं ठरवलं तरी शंभर टक्के यशस्वी होणं केवळ अशक्य आहे. कारण सोशल मीडिया, टीव्ही या गोष्टींमुळे सगळे नको ते संस्कारच घेऊन ही पिढी पुढे चालली आहे. यातून नैतिकता, सभ्यता, संस्कृतपणा ही समाजाला आणि शेवटी पर्यायानं कुटुंब व्यवस्थेला आवश्यक जीवनमूल्यं रुजवायची कुणी आणि कशी हा मोठा प्रश्न आहे. आजची आई यात धन्यता मानते की तिची छोटीशी सहा-सात वर्षांची परी कशी वेस्टर्न गाण्याच्या तालावर लटके झटके देत थिरकते आणि याचे व्हिडिओ रिल्स बनवून ती सोशल मीडियावर अपडेटही करते. शॉर्ट शॉर्ट फ्रॉक्स, पायात हिल्स घालून बर्थडे पार्टीला छोट्या छोट्या मुलींना पालक हॉटेल्स मध्ये सोडून येतात. या कोवळ्या वयातल्या मुली नकळतच तरुणाईच अंधानुकरण करण्यात स्वतःला धन्य मानत असतील तर चूक कोणाची? तिन्हीसांजेला देवापुढे दिवा लावून पाढे, रामरक्षा, शुभंकरोती म्हनणं हे तर अतिच मागासलेपणाचं वाटतं नाही का? आणि काय फायदा हो शुभंकरोती म्हणून? त्यापेक्षा माझ्या मुलीला अमुकतमुक बँडचं सॉंग कसं विथ ॲक्शन म्हणता येतं ते बघा. असं वर्षातून एकदाच नाही तर रोजच विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम चालू असल्यावर कसली जीवनमूल्य वाढावीत?

असे एक दोन नाही तर खूप सारे सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. प्रसंगी आपापल्या परीने आपण त्यातनं पळवाटा शोधतो. पण खरंच या प्रश्नांची उत्तरं द्यायची एक वेळ प्रत्येकावर निश्चितच येणार आहे. आणि हा प्रत्येक जण म्हणजे आजच्या आणि या आधीच्या पिढीतले आई बाबा तर नाहीत? एकत्र कुटुंब व्यवस्था ढासळत गेली आणि पर्यायाने एक विस्कळीत दिशाहीन समाज व्यवस्था आकाराला येत गेली. काय आपण खरंच या खुल्या विचारांची फळं चाखतो आहोत? हा विचार काही मूठभर लोकांनी करून फारसा फायदा होणार नाही तर संपूर्ण समाजानं यावर विचार करून स्वतःवर आणि इंटरनेटसारख्या माध्यमांवर आवश्यक तिथं निर्बंध घालून घेणं गरजेचं आहे. पण हे होणार कसं? चला तर मग सुरुवात आपल्यापासूनच करूया. आज पासून आपणच पाच नियम स्वतःसाठी ठरवून घेऊया आणि ते मोठ्या अक्षरात एका चार्टवर लिहून भिंतीला चिकटवून ठेवूया जेणेकरून जाता येता घरातल्या प्रत्येकाने ते वाचावं आणि नियमांचं पालन करावं. बघूया काही फरक पडतो का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पाच नियम घरातल्या सर्वांनी चर्चा करून ठरवणं अपेक्षित आहे. पाहूया पुढच्या लेखात आपल्याला काय काय करता येईल ते.

 

@अंजली दीक्षित-पंडित

छ.संभाजीनगर

९८३४६७९५९६

प्रतिक्रिया व्यक्त करा