*सिंधूपुत्र, श्री सत्यवान यशवंत रेडकर यांच्या २०० नाबाद व्याख्यानांचा झंझावात*
कोकणातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत आणण्यासाठी निरंतर निःशुल्क मार्गदर्शन प्रदान करीत राहणार- श्री. सत्यवान यशवंत रेडकर
जवळपास अडीच वर्षात सिंधुदुर्ग ते पालघर पर्यंत संपूर्ण कोकण प्रांत पिंजून काढून कोकणात ज्ञानरूपी गंगा आणण्यासाठी भगीरथाप्रमाणे अविरत कार्यरत राहून ज्ञानदानाच्या माध्यमातून कोकणातून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत यासाठी सावंतवाडी तालुक्यातील कवठणी (बोरभाटवाडी) या गावचे सुपुत्र, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी वसंतराव नाईक महाविद्यालय, मुरूड-जंजिरा, ता. रायगड येथे आपले नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे २०० वे व्याख्यान पूर्ण करून नाबाद द्विशतक साजरे केले.
विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययनाने प्रयत्न करून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादित करावे व परिणामी जो कोकण बोर्ड अव्वल स्थानावर येतो तो करिअरच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत सुद्धा अव्वल असावा ही भीष्मप्रतिज्ञा घेऊन अविरतपणे आपल्या आयुष्यातील वेळ कोकणातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून प्रदान करीत आहेत. त्यांच्या या शैक्षणिक चळवळीतून कोकणातील असंख्य विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी विविध मार्गदर्शन निरंतर प्रदान होत आहे. आज जे बिजारोपण सुरू आहे, याचे प्रशासकीय नोकरी संदर्भात वटवृक्षरूपी परिवर्तन नक्कीच होईल, जास्तीत जास्त कोकणातील विद्यार्थ्यांनी माझ्याजवळ असलेल्या ज्ञानाचा पुरेपूर लाभ घेऊन स्वतःचे करिअर घडविण्यासाठी व शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव निर्माण करण्यासाठी या शैक्षणिक चळवळीमध्ये सामील व्हावे असे आवाहन प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते, श्री सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क यांनी केले.