कुडाळ
तब्बल १५ दिवसानंतर गोवा- बांबुळी येथे उपचार सुरू असताना विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या वीज कंत्राटी कामगार धनंजय फाले या युवकाची आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मालवली. या घटनेने फाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धनंजयच्या पश्यात आई, वडील, आजी असा परिवार आहे.
कुडाळ -वेंगुर्ले मार्गालगत कुडाळ शहरातील गवळदेव मंदिरानजिक विद्युत खांबावर काम करताना कंत्राटी वायरमन धनंजय फाले (वय २६, रा. पिंगुळी गुढीपूर व मूळ रा. महादेवाचे केरवडे) यांना शाॅक लागून गंभीर जखमी झाल्याची घटना २१ जुलै रोजी घडली होती. कंत्राटी वायरमन फाले गवळदेव मंदिरनजिकच्या हाॅटेल अभिमन्यू समोरील वीज खांबावर दुरूस्तीचे काम करण्यासाठी चढले होते. तेथे १२ केव्ही वाहिनी असून दुरूस्तीचे काम करताना त्यांना अचानक वीजवाहिनीचा शाॅक लागला. त्यानंतर ते पोलावरच चिकटून राहिले. तेथील रस्त्याने जाणा-या नागरिकांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी वीज वितरण, पोलीस प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर त्या वीज खांबावरील वीजपुरवठा बंद करण्यात आला. वीज वितरण व पोलिस कर्मचा-यांनी तेथे धाव घेतली होती. कुडाळ एमआयडीसी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वीज कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचा-यांनी नागरिकांच्या मदतीने फाले यांना खाली उतरविले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी त्याच दिवशी गोवा येथील रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, मागील १५ दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. आज त्याची प्राणज्योत मालवली.
धनंजय फाले कुटुंब अतिशय गरीब कुटुंब आहे. घरी कोणीच कमविता नसल्याने धनंजय हाच कुटुंबाचा आधार होता. त्याचे मूळ घर महादेवाचे केरवडे येथील असून तो काही वर्षे पिंगुळी गुढीपूर येथे राहून आपली कामाची सेवा बजावत होता.