बांदा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका, जुगार सारखे अवैद्य धंदे बोकाळले असून यामध्ये युवा पिढी बरबाद होत आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांची देखील मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याने गोवा सिंधुदुर्ग सीमेवरील पोलीस तपासणी नाक्यासह गस्त वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरवकुमार अग्रवाल यांच्याकडे केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अग्रवाल यांची ओरोस पोलीस मुख्यालयात श्री लाड यांनी भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रशांत गवस उपस्थित होते.
श्री लाड यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात बेकायदा जुगार अड्डे सुरु असल्याच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. मालवण, वेंगुर्ले तालुक्यात अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. याठिकाणी युवा पिढी आपले आयुष्य उध्वस्त करत आहेत. बेकायदा अड्डयावर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.
महाविद्यालयीन युवा पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात असून हे धोकादायक आहे. यासाठी गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात छुप्या पद्धतीने येणाऱ्या अमली पदार्थांना रोखण्यासाठी आपण सीमेवरील चोरवाटांवर लक्ष द्यावे तसेच या अवैद्य धंद्यात गुंतलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.
जिल्हा अधीक्षक अग्रवाल यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदा धंदे उखडून टाकण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन नेहमीच तत्पर असून यासाठी स्थानिकांनी देखील प्रशासनास सहकार्य करावे. सीमेवर गस्त वाढविण्यासाठी सीमाभागातील पोलीस ठाण्याना सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.