You are currently viewing जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा सिंधुदुर्गात अनागोंदी कारभार….

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा सिंधुदुर्गात अनागोंदी कारभार….

कबड्डी फेडरेशनचा आरोप; बदलीसाठी १५ ऑगस्टला आमरण उपोषण करणार…

सावंतवाडी

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डीसह अन्य खेळाडू खेळापासून वंचित आहेत. क्रीडा धोरणानुसार ४६ खेळापैकी २ खेळच सिंधुदुर्ग जिल्ह्यात खेळवले जात आहेत, अशी धक्कादायक माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून उघड करण्यात आली. दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संगनमताने गेल्या काही वर्षांत शासनाच्या ७० ते ८० लाख रुपयांचा अपहार झाला आहे. त्यामुळे येत्या १५ ऑगस्टला सहायक क्रीडा आयुक्त कोल्हापूर येथे बेमुदत उपोषण करू, असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्यावतीने आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी वसंत उर्फ अण्णा केसरकर, चेअरमन अर्चना घारे, उपाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर, विकास केरकर, जितेंद्र म्हापसेकर, जावेद शेख, दिनानाथ बांदेकर व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जितेंद्र म्हापसेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनने गोंधळ घातला आहे. त्यामुळे सर्वसामान्य खेळाडूंची संधी हुकली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी व कबड्डी फेडरेशनने गेल्या काही वर्षांत शासनाच्या ७० ते ८० लाख रुपयांचा चुराडा केला आहे. या अपहार प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा येत्या १५ ऑगस्टला बेमुदत उपोषणाचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनने दिला आहे.
यावेळी विकास केरकर म्हणाले, गेल्या १५ ते २० वर्ष कबड्डी पासून खेळाडू वाऱ्यावर सोडले गेले आहेत. सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे संस्थापक सदस्य वसंत उर्फ अण्णा केसरकर म्हणाले, मला मयत दाखविण्यात आले. याविषयी कोल्हापूर धर्मादाय आयुक्त यांनी सन २०१६ पासून कबड्डी फेडरेशनने केलेल्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या महाराष्ट्र कबड्डी फेडरेशनने सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनला मान्यता द्यावी, म्हणून सतत पाठपुरावा केला पण काही उपयोग झाला नाही.

सिंधुदुर्ग कबड्डी असोसिएशनच्या चेअरमन सौ. अर्चना घारे म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी नुसते कागदी घोडे नाचवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडू, विद्यार्थी खेळापासून वंचित राहिले आहेत. युवा क्रीडा धोरणानुसार ४६ खेळ अनुदानित आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त दोनच खेळ खेळले जातात वास्तविकता दहा खेळ खेळले जायला पाहिजेत. शासनाचा निधी येत असेल तर विद्यार्थी व खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे पण तसे होत नाही. त्यामुळे व्यावसायिक खेळ घेतले पाहिजेत. यावेळी नंदन वेंगुर्लेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी मोठा खर्च केला पण पायाभूत सुविधांची वानवा आहे. जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत खेळ खेळले जातात. जिल्ह्यातील २३८ माध्यमिक शाळा मध्ये फक्त ९२ क्रीडा शिक्षक आहेत त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक तफावत आहे त्यामुळे खेळांची अवस्था अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. जिल्ह्यात २१ क्रीडा संघटना रजिस्टर आहेत त्यांना क्रीडा अधिकाऱ्यांनी विश्वासात घेतले पाहिजे.

प्रतिक्रिया व्यक्त करा