भाजपची महावितरणवर धडक…..

भाजपची महावितरणवर धडक…..

वीज ग्राहकांनी चुकीची बिले भरू नयेत – जिल्हाध्यक्ष राजन तेली

कुडाळ :
जिल्ह्यातील ग्राहकांवर महावितरणने वीज बिलप्रश्नी कोणतीही दडपशाही करू नये. महावितरणने दडपशाही केल्यास भाजप आपआपल्या स्तरावर महावितरणला जाब विचारेल आणि त्यावेळी जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सर्वस्वी महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आंदोलनादरम्यान महावितरणला दिला. अधीक्षक अभियंता पाटील यांनी कार्यालयाच्या बाहेर येत आंदोलकांशी संवाद साधला असता आंदोलकांनी पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी आंदोलकांनी वीज बिले जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पोलिसांनी मज्जाव केला. दरम्यान जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प. अध्यक्ष सुमेधा नाईक, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्यासह ३५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेत प्रतीबंधात्मक कारवाई करून सोडून दिले.
कुडाळ येथील भाजपा कार्यालयात वीज बिलप्रश्नी एकत्र येत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कुडाळ एमआयडीसी येथील महावितरणच्या अधीक्षक कार्यालयावर गुरुवारी धडक दिली. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलक वीज वितरण कार्यालयाच्या गेटकडे पोहोचताच पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर आंदोलकांच्या विनंती नंतर त्यांना गेटच्या आत प्रवेश देण्यात आला. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यानच्या वेळी अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी बाहेर येत आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी आंदोलकांच्यावतीने राजन तेली, रणजित देसाई यांनी वाढीव वीज बिलासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. महावितरणचे अधिकारी वीज ग्राहकांशी सौज्यन्याने वागत नाहीत. वीज बिलावर सहा युनिट तरीसुध्दा एक हजार रुपये बिल आले कसे? याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. यावेळी श्री. पाटील यांनी महावितरणकडून आलेली सर्व बिले नियमाप्रमाणे आहेत, कोरोनाच्या काळात आपल्या प्रत्येक विभागाकडे जवळपास आठ हजार तक्रारी आल्या. त्यातील सर्व ग्राहकांना आम्ही समजावून सांगितले मात्र ७०० ते ८०० वीज ग्राहकांना समजविण्यात आम्ही कमी पडलो.पण आमच्याकडे एकही तक्रार पेन्डिंग नाही. आतापर्यंत १४१ कोटीपैकी १०७ कोटी रुपये वसुल झाले असून केवळ २५ टक्के वीज बिलाची येणे बाकी आहे. दरम्यान, अजुनही वीज ग्राहकांच्या काही तक्रारी असतील त्यांना निश्चितचं महावितरण समजावून सांगेल. तसेच वरिष्ठ पातळीवरून आलेल्या निर्दे शानुसार एक ते सव्वा महिने वीज ग्राहकाचे कनेक्शन तोडले जाणार नसल्याचे सांगितले. आंदोलकांच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली,रणजित देसाई यांनी अधिक्षक अभियंता विनोद पाटील यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास १५० पोलिसांची फौज अधिक्षक कार्यालय आवारात तैनात होती. जि.प.सदस्या सुमेधा नाईक, उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, राजु राऊळ, राजेश पडते, चेतन धुरी, बंड्या सावंत, सुनील बांदेकर, बंड्या मांडकुलकर, पप्प्या तवटे, मोहन सावंत, राजेश नेमळेकर आदिसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

वीज ग्राहकांनी चुकीची बिले भरू नयेत : राजन तेली
वीज बिले वाढीव द्यायची आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना नोटिशीही द्यायच्या ही शासनाची कुठची पध्दत? अशा नोटिशींची आम्हाला फिकीर नाही, प्रशासनाने आधी सुरू असलेले अवैद्य धंदे डोळसपणे पाहावेत. जोपर्यंत शासन वाढीव बिल माफ करत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. उर्जामंत्र्यांनी सर्व सामान्य वीज ग्राहकांना भुदंड घातला आहे, त्याचा आम्ही निषेध करत आहोत असे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगून वीज ग्राहकांनी चुकीची बिले भरू नयेत, असे आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा