*कुडाळ पोलीस निरीक्षक रूनाल मुल्ला यांच्यासमोर आव्हान*
कुडाळ येथे मटका व्यवसाय तेजीत सुरू असून खुलेआम स्टॉल वर मटका घेतला जात आहे. त्यामुळे नव्यानेच कुडाळ पोलीस निरीक्षक पदावर रुजू झालेल्या महिला पोलिस अधिकारी रूनाल मुल्ला यांच्यासमोर मटका व्यवसाय बंद करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
कुडाळ येथे एका हॉटेलच्या बाजूला मटका व्यावसायिकांचे प्रोफेशनल ऑफिस सुरू असून मटक्याचे सर्व व्यवहार तिथूनच होतात. कुडाळ येथील स्थानिक खाकीला याबाबत कल्पना आहे, परंतु नव्याने कुडाळ पोलीस निरीक्षक पदावर दाखल झालेल्या महिला पोलिस अधिकारी मात्र अनभिज्ञ आहेत. त्यामुळे कुडाळ येथे सुरू असलेल्या मटक्याच्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे नूतन पोलीस निरीक्षकांना आव्हान आहे.
कुडाळ तालुक्यातील अनेक महिला बचतगटाच्या माध्यमातून घर बसल्या व्यवसाय करून स्वतः रोजगार निर्मिती करत असून त्यातून मुलांचे शिक्षण, घरातील सांसारिक जबाबदाऱ्या उचलत आहेत. परंतु मटका स्टॉल वर पुरुष वर्गाची असलेली गर्दी चिंताजनक विषय आहे. जेव्हा पती तिला दूर उभा करून मटका स्टॉल वर जातो तेव्हा बाजारासाठी पतीसोबत आलेली महिला चिंतित दिसते. कारण बाजारासाठी आणलेले पैसे कमी पडतात आणि पती मटका खेळून पैसा वाया घालवतो. पत्नी त्यावेळी पतीला जाब विचारताच पती भर रस्त्यात तिला शिव्या घालतो. कुडाळ बाजारपेठेत संवाद मीडियाच्या प्रतिनिधीने जेव्हा असे चित्र पाहिले तेव्हा गलबलून आले. मटक्याच्या नादात अनेक घरांमध्ये असे प्रसंग घडतात आणि मटका घेणारे अवैध्य धंदा करणारे धंदेवाले मात्र गब्बर होतात. महिला वर्गावर होणारे असे अत्याचार पाहून कुडाळच्या धडाकेबाज नूतन महिला अधिकारी रूनाल मुल्ला नक्कीच दखल घेतील आणि अवैध्य धंद्यावर कडक कारवाई करतील अशी आशा महिला वर्गाला वाटत आहे.