You are currently viewing ईस्टोअर कडून ग्राहकांच्या फसवणूक प्रकरणी कारवाई करा – परशुराम उपरकर

ईस्टोअर कडून ग्राहकांच्या फसवणूक प्रकरणी कारवाई करा – परशुराम उपरकर

पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर…

मालवण

इस्टोअर कंपनीकडून तालुक्यातील ग्राहकांची १५ ते २० कोटी रूपयांची फसवणूक झाली आहे. ईस्टोअरमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांच्या तक्रारी नोंदवून ईस्टोअरच्या सर्व वरिष्ठांशी चौकशी करून कारवाई करावी. तसेच फसवणूक करणाऱ्या कंपन्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊ नयेत यासाठी योग्य कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मनसे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली ईस्टोअरमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांना दिले. याप्रकरणाची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांना देऊन कारवाई करण्यात येईल असे श्री. कोल्हे यांनी सांगितले.

यावेळी मनसेचे अमित इब्रामपूरकर, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संदिप लाड, विशाल ओटवणेकर, उदय गावडे, तुषार जुवेकर, प्रशांत पराडकर आदि उपस्थित होते.

श्री. उपरकर म्हणाले, इस्टोअर फसवणूकप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या पत्रानुसार आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे चौकशी सुरू झाली होती व त्यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पत्र पाठवून तक्रारीची माहिती घेण्यास सांगितली होती. त्यावेळी फसवणूक झालेल्या ठेवीदारांना कंपनीचे वरिष्ठ यांनी सर्व एजंट व त्यांच्या प्रमुखांना पैसे येणार असे सांगितले होते. ९९९ रूपये भरून अकाऊंट टॉपअप करा असे सांगितले जात होते. परंतु अद्यापही ईस्टोअरच्या ग्राहकांना व ठेवीदारांना पैसे मिळालेले नाहीत.

उपरकर म्हणाले, ईस्टोअरमध्ये फसवणूक झालेली अशा तालुक्यातील ईस्टोअरच्या ८० ग्राहकांनी मनसे कार्यालय येथे उपलब्ध फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तक्रारी दिल्या आहेत. फसवणूक प्रकरणातील ग्राहकांच्या तक्रारी दाखल करून घ्याव्यात. यावर पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी ईस्टोअरमध्ये ज्यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी मालवण पोलीस ठाण्यात येऊन त्याबाबतची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा