You are currently viewing माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना बुटांचे वाटप

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना बुटांचे वाटप

*स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हा असे सांगणारे धर्म सेवक सोन्या पाटील – डॉ. किशोर पाटील*

भिवंडी (गुरुदत्त वाकदेकर) :

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने भिवंडी तालुक्यातील समाज कल्याण न्यास, महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा धर्मसेवक डॉ. सोन्या काशिनाथ पाटील यांनी दिलेल्या शब्दानुसार त्यांनी आपला तंतोतंत शब्द पाळला व ए.बी.एम समाज प्रबोधन संस्था कल्याण संचलित आदिवासी कातकरी मुला मुलींची आश्रमशाळा बाबरे, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे या ठिकाणी बुधवार २६ जुलै २०२३ रोजी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बूट वाटप करण्यात आले. तर लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ए.बी.एम समाज प्रबोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिताराम गायकवाड यांनी भूषविले होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा पद्मश्री अण्णासाहेब जाधव, भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडीचे संस्था-अध्यक्ष डॉ. विजय पांडुरंग जाधव, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव डॉ. किशोर बळीराम पाटील, महाराष्ट्रातील लाडके गायक तथा बिग बॉस फेम संतोष चौधरी उर्फ दादुस, समाज कल्याण न्यासचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर, शेलार शाखा अध्यक्ष विलास वारघडे, शितल सिताराम गायकवाड, आश्रम शाळेच्या अध्यक्षा पुनम भडांगे, लावणी कलावंत महासंघ मुंबईचे अध्यक्ष संतोष लिंबोरे व त्यांचे सर्व सहकारी कलावंत, आश्रम शाळेचे अध्यक्ष नवसु दिघा, कार्यकारी अध्यक्ष संतोष पडवळ, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रणखांबे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कपिल सातपुते यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर ईशस्तवन आणि स्वागत गीताने विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे लेझीम, ढोल ताशांच्या गजरात व संगीताच्या ठेक्यावर आदिवासी नृत्याची झलक देऊन मान्यवरांना मानवंदना दिली.

संपूर्ण महाराष्ट्रात गोरगरिबांसाठी काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सोन्या काशिनाथ पाटील असे मी नेहमी सांगत असतो कारण, त्यांच्या संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. मात्र, त्याहीपेक्षा आमच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये दीपावली सणानिमित्ताने आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन प्रत्येक आदिवासी भगिनींना साडी वाटपाचा कार्यक्रम आणि त्यांच्या मुलांना खाऊ वाटप त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य वाटप ते गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यामुळे दीपावलीच्या दिवशी या आदिवासी भगिनी सोन्या पाटील यांच्या साडीची वाट बघत असतात. मी त्यांच्या कार्याला सलाम करतो, अभिवादन करतो, कारण असे कार्यकर्ते समाजाचे सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी व सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येत असतात. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे संस्था अध्यक्ष माझे मुख्य मार्गदर्शक डॉ. विजय जाधव यांच्यामुळे मी आज इथपर्यंत झेप घेऊ शकलो आहे. त्यांनी मला दिशा दाखवली त्यामुळेच मी यशाची शिखरे गाठू शकलो, हे सांगताना मला त्यांचा अभिमान वाटतो. मी ज्यावेळी एका छोट्याशा झोपडीत शाळा सुरू केली, त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शौर्य पदक मिळाले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आज आपण ज्या मुलांच्या समोर उभे आहोत त्या मुलांच्या पूर्वजांनी सर्वप्रथम पुस्तकाला हात लावले, व त्यांच्यामुळेच आपण आज सर्व शिकलो आहोत. तसेच या ठिकाणी लावणी कलावंत महासंघ मुंबई यांचेही मी मनापासून आभार मानतो कारण दुसऱ्याचे दुःख कमी करण्याचे काम हे कलाकार करत आहेत. लावणी महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यांच्या कलेमुळे आपण आपले दुःख विसरून जातो. त्यांच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम ते करत आहेत, असे अध्यक्षीय भाषण करताना सिताराम गायकवाड यांनी सांगितले.

कोणताही कार्यक्रम असो डॉ. सोन्या पाटील यांना खूप तळमळ असते. नेहमी सामाजिक बांधिलकी जपत निपक्षपणे काम करत असतात. दरवर्षी ते १०,००० साड्या, २ लाख वह्या वाटतात. आज या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना बूटांचे वाटप केले आहे. हातावर पोट असणारा आदिवासी कातकरी समाज आहे. पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी अनवाणी चालतात, त्यांची वेदना लक्षात घेऊन त्यांना आज बुटांचे वाटप केले आहे. तसेच आनंद आज याचा झाला की, आपल्या सोबत मनोरंजना बरोबर समाजसेवेचे कार्य आणि अंगीकारलेले लावणी कलावंत महासंघ मुंबई यांनी देखील या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणले आहे, त्यांचे सहकार्य देखील मोलाचे आहे. आदिवासी कातकरी समाजाला पुढे नेण्यासाठी सोन्या पाटील यांच्यासोबत आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे डॉ. विजय जाधव यांनी यावेळी आपल्या मनोगतात सांगितले.

आज कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी धर्म सेवक डॉ. सोन्या पाटील यांचे मोठे बंधू ईश्वर पाटील यांचे चिरंजीव तेजेश ईश्वर पाटील यांचे अकस्मित निधन झाले, म्हणून कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, एवढे मोठे दुःख घरात असताना देखील त्यांनी मला सांगितले आपला कार्यक्रम हा दोन वेळा रद्द केला होता मात्र, आज रद्द करू नका, कारण कार्यक्रम हा पूर्ण नियोजित ठरवलेला होता, मी जरी नसलो तरी सदर कार्यक्रमाला जाऊन कार्यक्रम यशस्वी करा. त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी म्हणून आलो आहोत. त्यांनी कोणाला शब्द दिला तर त्या शब्दाचे ते पालन करतात. आपल्या मनात कितीही दुःख असले तरी ते सर्व विसरून दुसर्‍याच्या सुखात सामील होण्याचे काम आपण केलं पाहिजे अशी भावना त्यांच्या मनात असते. आज या कार्यक्रमाला त्यांच्या प्रेमापोटी लावणी कलावंत महासंघ मुंबई यांनी त्यांना सांगितले की, आम्हीही या कार्यक्रमाला आमच्या परीने जी काही होईल ती मदत करू. त्यामुळे मी त्यांच्या वतीने लावणी कलावंत महासंघाचे मनापासून आभार मानतो. तसेच ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य होईल अशा ठिकाणी आमच्या सोबत या आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू, असे मी दादांच्यावतीने आश्वासन देतो कारण
स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हा असे सांगणारे धर्म सेवक डॉ. सोन्या पाटील आहेत, अशा भावना संपादक डॉ. किशोर पाटील यांनी व्यक्त केल्या. तसेच, गेली तीन वर्ष या शाळेचा दहावीचा निकाल १००% लागतो, म्हणून सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो. यापुढेही आपण अशीच प्रगती करावी अशा शुभेच्छा देतो, असेही त्यांनी सांगितले.

सोन्या पाटीलांचे कार्य पाहून आम्ही त्यांना सांगितले आमच्या परीने जी काही होईल ती मदत आम्ही करू आणि कार्यक्रमाला नक्की येऊ असे त्यांना आश्वासन दिले होते, म्हणून आज आम्ही या ठिकाणी पोहचलो. कोरोना काळात आमच्या सर्व कलाकारांवर मोठे संकट आले होते. त्यामध्ये काही आमचे कलाकार स्वर्गवासी झाले तर काहींची घरे उध्वस्त झाली, तरीदेखील आम्ही लावणी कलावंतांच्या माध्यमातून सर्वांना मदतीचा हात दिला. लोकांच्या मनोरंजनाबरोबरच त्यांची सेवा करण्याचा आमचा मानस आहे, असे संतोष लिंबोरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक बिग बॉस फेम संतोष चौधरी उर्फ दादूस यांच्या गायनाने कार्यक्रमात रंगत आली. विद्यार्थ्यां बरोबर शिक्षकांनीही ताल धरला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रणखांबे यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन विवेक पष्टे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संस्थापक अध्यक्ष सिताराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा