You are currently viewing दांडेलीत वीज वितरणाचा खेळखंडोबा

दांडेलीत वीज वितरणाचा खेळखंडोबा

जीर्ण विद्युत वाहिन्या, खांब धोकादायक : मागण्यांची पूर्तता न केल्यास आंदोलनाचा इशारा

बांदा

दांडेली गावात अस्तित्वात असलेल्या विद्युत वाहिन्या व खांब बरीच वर्षे झाल्याने जीर्ण झाले आहेत. परिणामी वाहिन्या सतत तुटून प्रवाह वारंवार खंडित होतो. तर दुसरीकडे विजे अभावी शालेय विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यास करावा लागतो. ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. अशा वीज संदर्भात अनेक मागण्यांचे निवेदन दांडेली ग्रामस्थांनी वीज वितरणला दिले. तसेच सात दिवसांच्या आत पूर्तता न झाल्यास वीज कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा लेखी इशाराही सरपंच निलेश आरोलकर यांनी समस्त ग्रामस्थांच्यावतीने दिला आहे.
दांडेली गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. जीर्ण विद्युत वाहिन्या व खांब बदलण्याकडे महावितरणचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. वाऱ्या पावसामुळे झाडांची पडझड होऊन वीज वाहिन्या तुटून जमिनीवर पडतात. दांडेली गावासाठी स्वतंत्र वायरमन नसल्यामुळे ग्रामस्थांना पूर्ण वर्षभर विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागतो. तसेच गावातील काही वाड्यांना सुरू असलेला पाणीपुरवठा विजेअभावी बंद असल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासते, असे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सततचा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने दांडेली गावासाठी मळेवाड येथून विशेष विद्युत वाहिनी सुरू करून द्यावी व ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करावी. सदर मागण्यांची पूर्तता निवेदन दिल्यानंतर सात दिवसांच्या आत न झाल्यास दांडेली गावातील एकही विद्युत ग्राहक बिले भरणा करणार नाही. त्यापुढे जात सावंतवाडी विद्युत महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे महावितरणला दिला आहे. ग्रामस्थांनी दिलेले निवेदन सरपंच निलेश आरोलकर यांनी वीज अधिकाऱ्यांना दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा