सी ई ओ प्रजीत नायर यांची उपस्थिती
कुडाळ
कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मान्सून महोत्सवाअंतर्गत ‘चिखलधुणी’ हा अभिनव उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आज कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथे मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. या ठिकाणी दोन कोपऱ्यामध्ये बैल जोत बांधून पारंपरिक शेती आणि दुसऱ्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने भात रोपांची लागवड करण्यात आली. नवीन पिढी मातीपासून दूर गेली असून त्यांची पुन्हा मातीशी नाळ जोडली जावी हा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेऊन कुडाळ पंचायत समितीच्या वतीने हुमरमळा ग्रामपंचायत मालकीच्या २ हेक्टर जागेत विविध अशा १५९ वनौषधींचा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प साकारला आहे. त्याचबरोबर नरेगाअंतर्गत बांबू आणि फळ लागवड उपक्रम राबवून अशा विविध उपक्रमांनी चिखलधुणी साजरा करण्यात आला.
यावेळीही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, आयएएस अधिकारी करिश्मा नायर, आयएएस अधिकारी विशाल खत्री, आयएएस अधिकारी विशाल तनपुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांची मुख्य उपस्थिती होती.
तरवा काढण्याचा घेतला आनंद
भातरोपे म्हणजे तरवा कसा काढला जातो, याची प्रत्यक्ष कृतीद्वारे माहिती उपस्थित मान्यवरांनी घेतली. यावेळी महिला आणि पुरुष वर्गाने स्थानिक भाषेतील गाणी म्हणत शेतीची कामे कशी करतो, याचा प्रत्यक्ष अनुभव उपस्थित मान्यवरांनी घेतला.
शेतकरी सोनू पालव, श्वेता पालव यांचे गाणे ठरले स्फूर्ती देणारे
या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सोनू पालव आणि त्यांची पत्नी यांनी म्हटलेल्या विशेष गाण्याने झाली.
शेतीची महती सांगणारे गाणे पालव दांपत्याने सादर केल्याने कार्यक्रमस्थळी शेतीविषयक वातावरण निर्माण झाले. तर यावेळी हुमरमळा प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचे “सर्जा राजा” नृत्याद्वारे स्वागत केले. तर महिला वर्गाने सुद्धा मालवणी भाषेतील शेतीच्या ठिकाणी म्हटली जाणारी गाणी म्हटली. या सर्व गाण्यांना उपस्थित नागरिकांचा प्रतिसाद लाभला. तर उपस्थित मान्यवरांनी सुद्धा छोट्या मुलांना दाद देत अभिनंदन केले.
मुख्य अधिकारी प्रजित नायरही शेतबांधावर
हुमरमळा गावातील प्रगतशील शेतकरी न्हानू पालव यांच्या शेतामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, आयएएस अधिकारी करिश्मा नायर, आयएएस अधिकारी विशाल खत्री, आयएएस अधिकारी विशाल तनपुरे,
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांनी शेतीच्या कामाचा आनंद घेतला.
स्वतः प्रजित नायर हे शेत मळ्यात उतरून त्यांनी स्वतः पारंपरिक बैल जोत चालविले. तसेच आधुनिक पद्धतीने म्हणजे ट्रीलरद्वारे शेतात चिखलवणी, लावणी केली. तसेच आयएएस अधिकारी करिश्मा नायर, आयएएस अधिकारी विशाल खत्री यांनी सुद्धा शेतात उतरून ग्रामीण शेतीचा मनमुराद आनंद लुटला.
तरुण पिढीला शेतीची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न : विजय चव्हाण
यावेळी गटविकास अधिकारी विजय चव्हाण म्हणाले की, भारत हा शेतीप्रधान देश आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आपण कृषी क्षेत्रात सुधारित कृषी तंत्रज्ञान व संशोधन आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांचा वापर करून क्रांती केली आहे. पावसाळ्यात कोकणात प्रामुख्याने भात हे मुख्य पीक घेतले जाते. भात पिकालाही सुधारित संकरित वाण आणि यांत्रिकीकरण याद्वारे मोठी प्रगती झाली आहे. शेतकरी कमीत कमी क्षेत्रात संकरित वाण आणि यांत्रिकीकरणाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेत आहेत. तरीही पौष्टिकता आणि औषधीय गुणधर्माच्या उपलब्धतेमुळे आजही जुन्या पारंपरिक वाणाच्या भाताचे आहारातील महत्त्व वाढले आहे. असे असले तरीही वाढते शहरीकरण व झपाट्याने कमी होणारी श्रमप्रतिष्ठा, शेतीत काम करणारे मनुष्यबळ कमी होत असल्याने दरवर्षी भात पिकाखालील क्षेत्र घटत आहे. त्यामुळे भात शेती करणारा आपला बळीराजा किती कष्टाने शेती पिकवतो याची ओळख नोकरदार बंधू-भगिनींना व्हावी, शेतकऱ्यांबद्दल मनात आदरभाव निर्माण व्हावा म्हणून कुडाळ पंचायत समितीच्या वतीने शेतकऱ्याच्या शेतात उतरून पारंपरिक पद्धतीने स्थानिक वाण आणि श्री पद्धतीने सुधारित वाणाच्या भात रोपांची लावणी केली. तसेच शेतीपासून लांब जाणाऱ्या आजच्या तरुण पिढीला शेतीची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले आहेत.