ग्रामस्थांचे तहसील प्रशासनाला निवेदन
वैभववाडी
वैभववाडी – उंबर्डे मार्गावरील धोकादायक झाडांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चार ते पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीत झाडे उन्मळून पडली होती. याचा फटका वाहन चालक व प्रवाशांना बसला होता.
तरी धोकादायक झाडे तात्काळ तोडण्यात यावीत या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार श्री कवळेकर यांना वैभववाडीतील ग्रामस्थांनी दिले आहे. वैभववाडी – उंबर्डे मार्गावरील झाडे ही अपघाताला निमंत्रण देत आहे. ती आकेशियाची झाडे कोणत्याही स्थितीत पडण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने केलेल्या गटारे खुदाईत ही झाडे अधिक कमकुवत झाली आहेत. अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम उपविभाग वैभववाडी यांना याबाबत कळविले. परंतु संबंधित विभाग याकडे डोळे झाक करत आहेत. संबंधित विभागाला सुकलेली व रस्त्यावर झुकलेली झाडे तोडण्याच्या आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार, सचिन सावंत, महेश रावराणे, राजू पवार, किशोर दळवी, ओजस साळुंखे आदी उपस्थित होते.