मालवण
आगामी काळात होऊ घातलेल्या पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला यश मिळवायचे आहे. त्यादृष्टीने काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, युवा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी येथे केले.
शहरातील धुरीवाडा येथील संस्कार हॉल येथे तालुका काँग्रेसची सभा पार पडली. यावेळी तालुका काँग्रेसचे निरीक्षक अनिल डेगवेकर, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष महेश अंधारी, जिल्हा सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, महेंद्र मांजरेकर, तालुका सेवादल अध्यक्ष चंदन पांगे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सरदार ताजर, संदेश कोयंडे, देवानंद लुडबे, लक्ष्मीकांत परुळेकर, पराग माणगावकर, प्राची माणगावकर, जेम्स फर्नांडिस, ऐश्वर्या मेस्त्री, अझरुद्दीन अथनीकर, मुबारक अथनीकर, दिवाकर मसुरकर, योगेश्वर कुर्ले, संजय धुरी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. डेगवेकर म्हणाले, सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती विचित्र बनली असून जनता या सर्वाला कंटाळली आहे. सध्याचे राजकीय वातावरण हे काँग्रेसला पोषक आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळेल. त्या अनुषंगाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने काम करावे. सत्ता आपली नसली तरी सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.