You are currently viewing जगतो जीवन

जगतो जीवन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर (अमेरिका) लिखित अप्रतिम लेख*

 

*जगतो जीवन*

 

आदम आणि ईव्ह हे जगातील आदिमानव असे मानले जाते. ब्रह्मा ने जेव्हा विश्वाची निर्मिती केली तेव्हा डोंगर, दरीखोरी, डोंगरातून वाहणारे पाणी म्हणजेच नद्या, समुद्र, वनस्पती, पाण्यात राहणारे मासे, पक्षी आणि पशू यांची टप्प्याटप्प्याने निर्मिती केली. त्यानंतर वानरे निर्माण झाली आणि उत्क्रांती होत होत माकडातून मानव जन्माला आला.

तो रानावनातच रहात होता. आदम आणि ईव्ह, स्त्री आणि पुरुष हा भेद हळूहळू लक्षात येऊ लागला.

मानवाआधी निर्माण झालेल्या जलचर, वनचर प्राण्यांहून ही मानव जात अतिशय भिन्न असल्याचे लक्षात आले. मुख्य म्हणजे त्याला बोलता येत होते, आणि त्याला बुद्धी होती. त्याच्या या बुद्धीमुळेच उघड्या रानांतून तो झाडा पानांच्या बांधलेल्या कुटीत आला. दगडावर दगड घासून अग्नी उत्पन्न होतो हे त्याला समजले, आणि तो कच्च्या अन्नावरून शिजविलेले अन्न सेवन करू लागला. त्याच्या ठिकाणी लज्जा उत्पन्न झाली, त्यामुळे तो वृक्षांच्या पानांनी लज्जा रक्षण करता करता अंगावर वस्त्रे परिधान करू लागला.

आज आपण सर्वच मोठ्या अभिमानाने माणूस म्हणून जगत आहोत. असेही म्हटले जाते की चौर्यांशीलक्ष योनींतून फिरत फिरत आपल्याला हा माणसाचा दुर्मिळ जन्म मिळाला आहे. अर्थातच माणूस म्हणून जगताना आपले काय कर्तव्य आहे, काय जबाबदारी आहे हे पडताळून पाहणे अतिशय आवश्यक आहे.

माणसाचा एकच धर्म मानवता. म्हणजे नक्की काय? या ठिकाणी मला कवी पी. सावळाराम यांच्या सुप्रसिद्ध गीताची आठवण आल्याशिवाय रहात नाही.

* जो आवडतो सर्वाला तोचि आवडे देवाला*

त्यात कवी सांगतात, देवाला आवडणारा माणूस कसा असतो, तर एखादा दीन, दुबळा, भुकेला असा कोणी त्याला भेटला तर स्वतःच्या घासातला घास त्या गरिबाला भरवितो.

एखाद्याच्या डोळ्यातले दुःख, वेदना त्याला सहज दिसतात.

*दीन भुकेला दिसता कोणी*

* घास मुखीचा मुखी भरवुनी*

* दुःख नेत्रीचे घेता पिऊनी*

* फोडी पाझर पाषाणाला*

एखाद्या लंगड्या, लुळ्या पांगळ्याला तो स्वतःच्या पाठीवर घेऊन त्याला मदत करतो. आंधळ्याला आधार देतो.

* घेऊनी पंगू आपुल्या पाठी*

* आंधळ्याची होतो काठी*

* जनसेवेचे बांधून कंकण*

* त्रिभुवन सारे घेई जिंकून*

* अर्पून आपुले हृद सिंहासन*

* नित्य भजतो मानवतेला*

देवाला आवडणाऱ्या अशा माणसांनी जनसेवेचे जणू व्रतच घेतलेले असते. त्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले असते. अशा रीतीने जगणाऱ्या माणसांच्या पायाखाली प्रत्यक्ष परमेश्वर त्याचे हृदय अंथरतो.* पायाखाली त्याच्यासाठी*

*देव अंथरी निज हृदयाला*

आपल्याला छत्रपती शिवाजी राजा होता

येत नसेल,देशाचे रक्षक होता येत नसेल, टिळक, आगरकर होता येत नसेल, सावित्री, सिंधुताई होता येत नसेल परंतु एखाद्या गरजवंताला माणूसकी या नात्याने मदतीचा हात

नक्कीच देता येऊ शकतो. माणूस म्हणून जगताना उच्च /नीच, श्रेष्ठ / कनिष्ठ असा भेदभाव, जातीयवाद नक्कीच आपल्या मनातून पुसून टाकता येईल.

एखाद्या सुंदर स्त्रीला तिच्या सौंदर्याची फार

घमेंड असते. सावळ्या मुलीला ती तुच्छ लेखते. गोरे किंवा काळे रूप कोणाच्या हातातली गोष्ट आहे का? सर्वांची बुद्धीही एकसारखी नसते पण एक मात्र नक्की की कोण कशात तर कोण कशात प्राविण्य संपादन करतोच. सगळेच डॉक्टर किंवा इंजिनीयर होत नाहीत. कोणी चित्रकार असेल,कोणी गायक असेल, कोणी साहित्यिक असेल तर कोणाला अभिनय कला अवगत असेल. प्रत्येकाचे स्वतःचे असे एक वैशिष्ट्य असतेच. मग कोणाची कला हलकी अन कोणाची श्रेष्ठ हा प्रश्नच उद्भवत नाही. प्रत्येकाने एक दुसऱ्याचा नेहमी आदर केला पाहिजे. आपण सर्व त्या एका भगवंताची लेकरे आहोत,हा सम बंधुभाव जर आपल्यात निर्माण झाला तर” एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” हे तुकाराम महाराजांचे वचन सार्थ ठरेल.

आमच्याकडे एकेकाळी चुलीवर स्वयंपाक

होत असे. जळणा साठी दारावर येणाऱ्या कातकरी बायकांकडून आमची आजी लाकडाच्या मोळ्या घेत असे. त्या इतक्या लांबून डोक्यावर भार घेऊन चालत चालत येत असत. दमल्या भागल्या त्यांना आजी प्रथम गार पाणी प्यावयास देत असे, नंतर लाकडांची खरेदी. शेतावरून काही बायका हातसडीचा तांदूळ घेऊन यावयाच्या, त्या तर जशा आजीच्या सख्याच. तिने त्यांच्यात व आमच्यात कधीच भेदभाव केल्याचे मला आठवत नाही. माझ्या वडिलांना कधी कोणी त्यांची जात विचारली तर त्यांचे उत्तर एकच. ” मी मानव जातीचा”.

संत कबीराने सांगून ठेवले आहे की

* रे चादर हो गई बहुत पुरानी*

* अब तो सोच समझ अभिमानी*

या माणसाच्या देहाला त्यांनी चादर असे म्हटले आहे. आपला देह नश्वर आहे, आज ना उद्या तो

नष्ट होणार आहे, एखाद्या चादरी प्रमाणे. संपूर्ण आयुष्यात अनेक दुष्कर्म घडली असतील, अनेक मोह पाशात तू जखडला असशील, आता आयुष्याच्या संध्याकाळी तरी विवेकाची कास धर.

कबीर जी म्हणतात,

*मैले दाग परे पापनके*

* विषयनमे लिपटाई*

*ग्यान का साबुन लाई के धोई*

* सत्संग के पाई *

तेव्हा जन्म ते मृत्यू संपूर्ण माणूस म्हणून जगताना आचरण शुद्ध ठेवावे, सत्संगती धरावी, परोपकार करावा. सदैव मुखी हरिनाम

असावे आणि ईश्वराचे लाडके व्हावे.

हा माणसाचा जन्म एकदा मिळाला आहे. हा

देह ईश्वराची ठेव आहे,ती नीट जपून ठेव.

पुन्हा ती मिळणे दुरापास्त आहे

* कहे कबीरा यही वस्तू बिरानी*

* यही राखो जतनसे*

* नही फिर हाथ मे आनी *

 

* अरुणा मुल्हेरकर*

* मिशिगन*

12/07/2023

प्रतिक्रिया व्यक्त करा