You are currently viewing कोकण रेल्वेवर प्रथमच विचित्र अपघात; सुदैवाने अनर्थ टळला!

कोकण रेल्वेवर प्रथमच विचित्र अपघात; सुदैवाने अनर्थ टळला!

रत्नागिरी :

कोकण रेल्वे मार्गावर विचित्र अपघात घडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते करंजाडीच्या दरम्यान चालत्या रोरो गाडीवरील ट्रक खाली पडल्यानं अपघात घडला आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने ट्रकमधील चालकानं प्रसंगावधान राखत वेळीच उडी मारल्यानं जीव वाचला. मुंबईहून गोव्याकडे जाणारी रो रो रात्री एक वाजण्याच्या दरम्यान दिवाण खावटीजवळ सुकिवली नदीच्या वळणावर आली असता रो रो ट्रेनवरील एक ट्रक अचानक खाली ट्रॅकवर पडला.

कोकण रेल्वे मार्गावर रो रो वाहतूक अनेक वर्षे चालू आहे. मात्र, रोरो ट्रेनमधून ट्रक पडण्याची ही पहिलीच घटना आहे. काही अंतरावर ट्रकला हादरे बसत होते. त्यामुळं ट्रकमधील चालक खाली उतरला. वेगानं जाणाऱ्या ट्रेनमधून कोसळलेल्या ट्रकचा चुराडा झाला. यामध्ये ट्रेनचा मधला भाग रुळावरून खाली उतरला. सुदैवानं मोठी दुर्घटना घडली नाही.

खाली पडलेल्या ट्रकमध्ये लोखंडी प्लेट होत्या. हा प्रकार झाल्यानंतर इतर गाड्या त्या त्या स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. कोकण कन्या आणि तुतारी या २ गाड्या दीड ते २ तास उशिरानं धावत होत्या. मात्र, कोकण रेल्वे प्रशासनाने या अपघाताची गंभीर दखल घेतली असून रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यानंतर अपघाताची दखल घेत पहाटेच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात आली.

 

रो रो सेवा काय आहे?

‘रो- रो सेवा म्हणजे रेल्वेच्या मालवाहतूक करणाऱ्या वॅगनमधूनच मालवाहतूक ट्रक आणि कंटेनर्सची ने-आण करण्याची व्यवस्था केली जाते. रस्ते वाहतुकीला पर्याय ठरू शकेल आणि इंधन बचत, प्रदूषण नियंत्रणासाठी उपयोगी ठरू शकेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा