You are currently viewing वैभववाडी शहरातील शासकीय जागेतील अतिक्रमण हटवा

वैभववाडी शहरातील शासकीय जागेतील अतिक्रमण हटवा

नगरपंचायतचे तहसीलदार दीप्ती देसाई यांना निवेदन

लवकरच स्टॉल, खोके हटाव मोहीम : तहसीलदार यांचे आश्वासन

वैभववाडी

वैभववाडी शहरात अतिक्रमणधारकांना गाले, खोके व हातगाडी लावण्यास परवानगी दिली आहे का ? परवानगी दिली नसल्यास तात्काळ अतिक्रमण हटवा, या मागणीचे निवेदन वाभवे – वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईंणकर यांनी तहसीलदार दीप्ती देसाई यांना दिले आहे. अतिक्रमण करणाऱ्या स्टॉल धारकांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात रीतसर नोटीस दिली जाईल. त्यांनी अतिक्रमण न हटविल्यास स्टॉल हटाव मोहीम हाती घेतली जाईल असे तहसीलदार देसाई यांनी सांगितले आहे.
वाभवे – वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील शासकीय जागेत सद्यस्थितीत विनापरवाना गाले, खोके व हातगाड्या दिसून येत आहेत. नगरपंचायतने सर्वसाधारण सभेत अतिक्रमण हटाव बाबत ठराव संमत केला आहे. त्यानुसार नगरपंचायतने अतिक्रमण हटविले होते.
मात्र पुन्हा एकदा नगरपंचायत हद्दीत राज्यमार्गाच्यालगत मोठ्या प्रमाणात गाले, हातगाड्या व खोके परवानगी शिवाय दिसून येत आहेत. नगरपंचायत मार्फत शहरात विविध विकास कामे प्रस्तावित आहेत. ती कामे करताना सदर अतिक्रमण हे अडथळा ठरणार आहे.
सदर अतिक्रमण आपल्या विभागाच्या अखत्यारीमधील जमिनीत होत आहे. सदर अतिक्रमणधारकांना स्टॉल, गाले व हातगाड्या लावण्यास आपणाकडून परवानगी देण्यात आली आहे का ? देण्यात आली असली तर परवानगीची प्रत नगरपंचायतीला उपलब्ध करून देण्यात यावी. आणि परवानगी दिली नसल्यास आपल्या स्तरावर सदर अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करावी. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी नगराध्यक्ष नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे, नगरसेवक डॉ. राजेंद्र पाताडे, माजी जि. प. सदस्य सुधीर नकाशे, नगरसेवक सुभाष रावराणे, नगरसेविका यामिनी वळवी, सुंदरा निकम, रेवा बावदाने व राजन तांबे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा