नाम. दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात रेडी येथील जुगाअड्ड्यानंतर नवनवीन अवैद्य धंदे सुरूच
सिंधुदुर्ग जिल्हा गेली काही वर्षे विविध अवैद्य धंद्यांसाठी गाजत आहे. यात प्रामुख्याने गोवा येथील अवैद्य दारू वाहतूक, विक्री, मटका, जुगार, यासारखे धंदे समाविष्ट होते. परंतु अलीकडे या अवैद्य धंद्यांबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अफू, चरस, गांजा विक्रीचे उद्योगही सुरू असल्याचे दिसून आले होते. अशा प्रकारच्या पैशाची चंगळ करणाऱ्या अवैद्य धंद्यांमध्ये आणखी एका अवैद्य धंद्याचा समावेश झाला असून मोठ्या शहरात चालणारा वेश्याव्यवसाय सारखा अवैध्य व्यवसाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगाव तिरोडा येथे सुरू असल्याचे वेंगुर्ला पोलीस आणि गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त कारवाईनंतर उघडकीस आले.
आजगाव तिरोडा येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे प्राप्त झाली होती. आजगाव माळ्यारवाडी येथील संतोष मधुकर लुडबे (वय 52) हे अन्नपूर्णा सेक्स वर्कर वेल्फेअर फाउंडेशनच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करीत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वतः पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह स.पो.नि.दाभोलकर, पोलीस कुबल, पो. हे.कॉ. वेंगुर्लेकर, पाटील, चव्हाण, सराफदार, राऊळ ,परब, सावंत, कांडर, खडपकर, भाटे व गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्ग पोलीस निरीक्षक व त्यांचे पथक पोलीस सहाय्यक शेळके, कोयंडे, केसरकर, काळसेकर, कदम, पोलीस कॉन्स्टेबल सरमळकर यांच्यासह आजगाव येथे वेश्याव्यवसाय चालणाऱ्या ठिकाणावर अचानक धाड टाकली. यावेळी वेश्याव्यवसाय चालवणारे संतोष मधुकर लुडबे यांच्यासह पर राज्यातील तीन महिला आढळून आल्या. सदर आरोपींवर वेंगुर्ला पोलीस स्टेशन मध्ये भा. द. वि. क. ३७० सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५९ (PITA)कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजगाव तिरोडा येथे घातलेल्या छाप्यात तीन पिडीत महिला आढळून आल्याने त्यांची रवानगी सुरक्षिततेसाठी सावंतवाडी येथील अंकुर महिला केंद्रात करण्यात आली. सदरच्या गुन्ह्याचा तपास स्वतः वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव करत असून सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सांगितले.
संवाद मीडिया मधून गेले काही दिवस वेंगुर्ला तालुक्यातील रेडी, सावंतवाडीतील कोलगाव आदी ठिकाणी सुरू असलेल्या अवैद्य जुगार बाबत वेळोवेळी आवाज उठविला गेला. परंतु वेंगुर्ला पोलीस म्हणजे संशोधनाचा विषय झाला असून वेंगुर्ला पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेडी उषा नगर येथे जुगाराच्या बैठका होत असून त्या ठिकाणी जुगार सुरू असताना सोडा वाटरच्या बाटल्या फोडून हाणामारी झाल्याबाबतही संवाद मीडिया मधून बातमीत प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु वेंगुर्ला पोलिसांकडून अवैद्य जुगारावर कोणतीही कारवाई न झाल्याने अवैद्य धंदेवाल्यांना पोलिसांचा आश्रय असल्याचे एकंदर परिस्थितीवरून लक्षात येते. त्यामुळे वेंगुर्ले पोलीसांच्या अखत्यारीत येत असलेल्या तिरोडा येथे अन्नपूर्णा सेक्स वर्कर वेल्फेअर फाउंडेशन या संस्थेच्या नावाखाली महिला व मुली आणून वेश्याव्यवसाय करण्याइतपत अवैद्य धंदेवाल्यांची हिम्मत झाली. वेंगुर्ला हा नाम.दीपक केसरकर यांचा मतदारसंघ आणि गेले काही दिवस ना. केसरकर यांचा मतदारसंघ अवैद्य धंद्यासाठी पोषक बनल्याचे सुरू असलेल्या अवैद्य धंद्यांवरून दिसून येत आहे. त्यामुळे नाम. केसरकर यांच्या मतदारसंघात नक्की चालले तरी काय..?? महाराष्ट्राच्या राजकीय शिमग्यामधून वेळ काढून नामदार केसरकर मतदारसंघाकडे लक्ष देणार की नाही..?? असे प्रश्न मतदार विचारू लागले आहेत.