You are currently viewing स्री पुरुष सहचर्य

स्री पुरुष सहचर्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री सुजाता नवनाथ पुरी लिखित अप्रतिम लेख*

 

*स्री पुरुष सहचर्य*

 

मागील आठवड्यात जागतिक पुरुष दिन आणि महिला उद्योजिका दिन होता.सोशल मीडियामुळे आता वेगवेगळे दिन माहिती व्हायला लागले आहेत.प्रत्यक्ष वास्तव काही का असेना परंतु सोशल मीडियावर येणारे मेसेजेस हेच आता असे दिवस साजरे करताना दिसतात. सोशल मीडिया सारख्या माध्यमातून असे निरनिराळे दिन साजरे होत असताना डोळ्यासमोर केवळ एक आभासी दुनिया निर्माण होत असते. म्हणूनच गमतीने असे म्हणतात कि तुमच्या सोबत आयसीयू समोर असतात तेच खरे तुमचे जिवलग मित्र असतात. नाहीतर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आणि व्हाट्सअप फेसबुक वर असणाऱ्या फ्रेंड्स लिस्टला काही ही अर्थ उरत नाही.
असं म्हटलं जातं कि सगळेच दिवस हे पुरुषांचेच असतात परंतु स्त्री-पुरुष साहचर्य असणे ही काळाची गरज आहे. कोणा एकाचे अस्तित्व खूप महत्त्वाचे आहे हे समजणे चूक ठरेल. पुरुषाला सर्वजण कणखर समजतात. परंतु प्रत्यक्षात तो स्री पेक्षाही हळवा असतो.
*हुंदक्यात व्यक्त न होणाऱ्या व्यथा पुरुषांच्या डोळ्यात असतात.त्या अश्रूंबरोबर वाहून जाऊ नयेत याचं ही भान ठेवण्याची जबाबदारी पुरुषांवर असते.*
म्हणूनच कि काय पुरुष हा बाहेरून निगरगट्ट असल्याचे दाखवतो.ऊन,वारा,पाऊस,पाणी यांचा मारा सहन करून ही उभ्या असणाऱ्या छतासारखा पुरुष सगळं काही सहन करून घरातल्या सदस्यांना प्रेमाने सांभाळत असतो.असे करीत असताना तो कित्येकदा स्वतःच्या भावना आणि इच्छा यांना आतल्या आत दाबून टाकतो. एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे आपण नेहमी म्हणत असतो, तेव्हाच एका यशस्वी स्त्रीच्या मागेही साथ देणारा एक पुरुष असतो हे लक्षात ठेवणे ही गरजेचे असते. पुरुष व्यक्त होत नाही. परंतु एखाद्या अवचित क्षणी कोसळू आणि कोलमडू शकतो.
जबाबदारीचे भान असणाऱ्या आणि सगळ्यांसाठी आधारवड असणाऱ्या चांगल्या पुरुषांच्या जीवावरच हा समाज पुढे चालला आहे. नवरा,बाप,भाऊ,प्रियकर अशा वेगवेगळ्या भूमिका अतिशय तन्मयतेने निभावणारे पुरुष समाजात कुटुंब संस्कृतीला टिकविण्याचे काम करतात. प्रसंगी अनवाणी पायाने चालतांनाही आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन चालणारा बाप म्हणजे असीम त्यागाचे अनमोल उदाहरण आहे. सगळेच पुरुष वाईट असतात असे नाही.
स्री पुरुष हा भेद जरी शारीरिक पातळीवर असला तरी व्यक्ती म्हणून मात्र त्या दोन्ही समान आहेत. या दोघातील ताकदीचा व संयमाचा हिशोब करत बसण्यापेक्षा स्री आणि पुरुष दोघेही एकमेकांना पूरक आणि साहचर्याने कसे वागतील हे पाहणे गरजेचे आहे. एक स्री जशी एका पुरुषाशिवाय अपूर्ण असते तसाच पुरुषही स्री शिवाय अपूर्ण असतो, म्हणूनच अर्धनारी नटेश्वराच्या प्रतिमेला महत्त्व येते.ज्यामध्ये अर्धे शरीर स्त्रीचे आणि अर्धे शरीर पुरुषाचे असते. ते मिळून अर्धनारी नटेश्वरची प्रतिमा तयार होते.जन्माला आलेल्या प्रत्येकालाच इथं संघर्ष वाट्याला येत असतो. फरक फक्त इतका असतो कि प्रत्येकाच्या संघर्षाच्या वाटा या वेगवेगळ्या असतात. अशा परिस्थितीत स्री श्रेष्ठ कि पुरुष श्रेष्ठ या लढाईत वेळ घालवण्यापेक्षा एकमेकांच्या हातात हात गुंफून चालत जाऊन जीवनाची वाट सुकर करणे हेच आपल्या हाती आहे. स्त्रियांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंच्या नदीवर धैर्याचे धरण बांधणारे पुरुष असतात.तर पुरुषांच्या रुक्ष जीवनात प्रेमाची मृदू हिरवळ आणणाऱ्या स्त्रिया असतात.म्हणजेच काय तर दोघेही निरोगी आणि चांगल्या समाज जीवनासाठी आवश्यक असतात.पत्नीच्या निधनानंतर मुलांचा प्रेमाने सांभाळ करणाऱ्या पुरुषाच्या अंतरात एक स्री वसलेली असते आणि पति निधनानंतर धैर्याने मुलांना वाढविणाऱ्या स्त्रीच्या अंतरातही एक पुरुष असतो.असे म्हणतात कि –
*संसाराची झोळी किती ही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ आहे तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत असते.*
म्हणूनच स्री आणि पुरुष हे एकमेकास अनुरूप असतात त्यात कोणी श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असू शकत नाही.

*सगळं तुला देऊन ओंजळ माझी भरलेली, डोळे उघडून पाहते तर तु तुझी ओंजळ माझ्या ओंजळीत धरलेली…*
या समर्पित भावनेने जर सर्व जण जगले तरच जीवनाला अर्थ आहे.
—————-

*✒️सुजाता नवनाथ पुरी*
अहमदनगर
8421426337

प्रतिक्रिया व्यक्त करा