मुंबई :
22 वर्षीय महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना मुंबई येथे घडली आहे. यासंदर्भात पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, मित्राने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये तिला गुंगीचं औषध देण्यात आलं, ही पार्टी अंधेरीतील तिच्या मित्राच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आली होती. यावेळी तिच्या पेयात आरोपींनी गुंगीचे औषध दिलं त्यानंतर ती बेशुद्ध झाली. बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
पीडित महिलेने या प्रकरणाची तक्रार याअगोदर भायखळा पोलीस ठाण्यात केली होती. परंतु, ही घटना अंधेरी परिसरात घडल्यामुळे ही तक्रार सहार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. त्यानंतर पीडितेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.