You are currently viewing कोळंब ग्रामस्थांची पाणी प्रश्नी ग्रामपंचायतीवर धडक…

कोळंब ग्रामस्थांची पाणी प्रश्नी ग्रामपंचायतीवर धडक…

चार दिवसांत पाईपलाईन दुरुस्तीचे काम होईल ; सरपंच सिया धुरींनी केले स्पष्ट…

मालवण

गेले तीन महिने नळाला पाणीच न आल्याने संतप्त कोळंब ग्रामस्थांनी भर पावसात आज ग्रामपंचायतवर धडक दिली. एवढा पाऊस पडूनही पाणी येत नसेल तर ग्रामस्थांनी करायचे काय ?असा प्रश्न केला. यावर सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर यांनी ही पाईपलाईन जुनी झाली असून वारंवार फुटत आहे. चार दिवसात पाईपलाईन दुरुस्त करण्यात येईल त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल असे स्पष्ट केले.

गेले तीन महिने कोळंब गावाला पाणी टंचाई भेडसावत आहे. उन्हाळ्यात विहिरीला पाणी नसल्याने ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहिले होते. त्यात पाऊस उशिरा आल्याने जुन महिन्यातही भिषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. आता मुसळधार पाऊस पडल्याने विहिरीलाही पाणीसाठा भरपूर आहे. तरीही पाणी न आल्याने संतप्त कोळंब टेंबवाडी येथील ग्रामस्थांनी भर पावसात ग्रामपंचायतला धडक दिली. यावेळी माजी बांधकाम सभापती अनिल न्हिवेकर, ग्रामपंचायत सदस्य भाऊ फणसेकर, विनायक धुरी, भाई ढोलम, प्रसाद भोजणे, दीपक भोजणे, सचिन नरे, सरिता हडकर, उज्वला भोजणे, मंदाकिणी हडकर, नमिता नरे, बाबू धुरी, उत्तम भोजणे, गणेश पेडणेकर, सुशांत भोजणे, राजू हडकर, रवींद्र जेठे यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

कोळंब गाव हा पूर्णपणे नळ योजनेच्या पाण्यावर अवलंबून आहे. एप्रिल ते जुन पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प आहे. आता विहिरीला पाणी भरपूर आहे. पण नियोजन शून्य कारभारामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास होत आहे. तसेच यापूर्वी काही ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तो ग्रामपंचायतने केला की अन्य कोणी याचा खुलासा व्हावा. इतर वाड्यांमध्ये बोअरवेल, त्यांच्या स्वतःच्या विहिरी आहेत. मात्र, कोळंब गावात नळ योजनेच्या पाण्याशिवाय इतर कोणतेही साधन नाही. एवढा पाऊस पडून पाणी येत नसेल तर ग्रामस्थांनी करायचे काय ? असा प्रश्न ग्रामस्थांनी केला.

यावर सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर यांनी आधी पंप नादुरुस्त होता. तो दुरुस्त करण्यात आला. मात्र, त्यावेळी विहिरीला पाणी नव्हते. विहिरीला पाणी आल्यानंतर पाणीपुरवठा सुरु केला. आडारी पर्यंत पाणी आले होते. पाईपलाईन जुनी असल्याने वारंवार पाईप फुटण्याचे प्रकार घडत आहेत. आता ज्याठिकाणी पाईप फुटला आहे. त्याठिकाणी भरपूर पाणी असल्याने दुरुस्त करणे अवघड बनले आहे. तरीही पाईपलाईन दुरुस्तीचे प्रयत्न सुरु आहेत. चार दिवसात पाईपलाईन दुरुस्त होऊन पाणीपुरवठा सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा