*श्री.सुरेश ठाकूर, अध्यक्ष – कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांची मागणी*
मालवण :
“वयाची 86 वर्षे पूर्ण करणाऱ्या दत्तात्रय शिवराम हेर्लेकर यांचे ‘ठुमकत मुरडत नाट्यछटा’ हे पुस्तक आज गुरुपौर्णिमे दिवशी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सोहळ्यात श्री.सुरेश ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशित झाले. या पुस्तकात असलेल्या 35 नाट्यछटां मुलांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या आहेत. सोपी भाषा आणि मुलांना आपल्या समोर घडत असलेल्या प्रसंग नाट्यावरील नाट्यछटा यांचा समावेश पूर्व प्राथमिक पाठ्यपुस्तकात होईल” असे उद्गार सुरेश शामराव ठाकूर, (अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवण) यांनी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात काढले. सदर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा को.म.सा.प. मालवणच्यावतीने आचरे येथील जामडूल रिसॉर्टच्या निसर्गरम्य वातावरणात साजरा झाला. यावेळी व्यासपीठावर लेखक दत्तात्रय हिर्लेकर यांचे समवेत रुजारीओ पिंटो (केंद्रीय सदस्य कोमसाप), गुरुनाथ ताम्हणकर (उपाध्यक्ष, कोमसाप मालवण), पांडुरंग कोचरेकर (कोषाध्यक्ष, कोमसाप मालवण), जेरॉन फर्नांडिस (माजी जि.प. सदस्य आचरे), अशोक कांबळी (अध्यक्ष, जेष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे), प्रमोद कोयंडे (बालसाहित्यिक), चंद्रहास हिर्लेकर (प्रकाशक) आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबीयांनी व कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवण यांचे वतीने त्यांचा 85 वा वाढदिवस साजरा केला.
सदर पुस्तकाचे परीक्षण करताना अशोक कांबळी म्हणाले, “नाट्यछटा हा प्रकार दिवाकर यांनी सुरू केला. मुलांमध्ये बालनाट्याची आवड निर्माण करण्यात या नाट्यछटा महत्त्वाची भूमिका बजावतील.” तर बालसाहित्यिक प्रमोद कोयंडे म्हणाले, “या पुस्तकात मालवणी नाट्यछटा, मुलींसाठी नाट्यछटा, फक्त मुलांसाठी नाट्यछटा असे प्रकार असून सर्व नाट्यछटांचे विषय सर्वपरिचित आहेत.” रुजारीओ पिंटो म्हणाले, “हिर्लेकर गुरुजींचे 86 वा वर्षी लिहिणे ही बाब तरुणांनाही लाजविणारी आहे. या नाट्यछटा खेडेगाव असो वा शहर, सर्वत्र मुलांना, शिक्षकांना, पालकांना भुरळ घालणाऱ्या आहेत.”
या कार्यक्रमात दत्तात्रय शिवराम हिर्लेकर यांची एक प्रकट मुलाखत सुरेश ठाकूर यांनी घेतली. यावेळी हिर्लेकर गुरुजींच्या नाट्यछटेच्या निर्मिती मागील रंजक आठवणी कथन केल्या. त्यानंतर यशश्री ताम्हणकर या बालकलावंताने ‘कोंबड्याचे बंगो’ ही मालवणी नाट्यछटा सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
दत्तात्रय हिर्लेकर यांनी आपल्या ८५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून व गुरूपौर्णिमेनिमित्त को.म.सा.प. मालवण शाखेला रोख ८५००/- (आठ हजार पाचशे) ची देणगी दिली.
स्वरा भोळे, हर्षल भोळे, अर्शिता मुणगेकर,आरुषी मुणगेकर आणि यशश्री ताम्हणकर ह्या कोमसापच्या बालसदस्यानी त्यांच्या हिर्लेकर आजोबांचा शाल, श्रीफळ प्रदान करुन सत्कार केला. चंद्रहास हिर्लेकर यांनी प्रकाशन सोहळ्यास आलेल्या शुभ संदेशाचे वाचन केले. तर गुरुनाथ ताम्हणकर यांनी सदर पुस्तकाला सुरेश ठाकूर यांनी लिहिलेल्या “ज्यानी तिसऱ्या घंटेवरही प्रेम केले” या प्रस्तावनेचे अभिवाचन केले. पांडुरंग कोचरेकर यांनी आभार प्रदर्शन केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुगंधा केदार गुरव यांनी केले.
सदर कार्यक्रमाला सायली परब, सुनंदा कांबळे, रामचंद्र कुबल, नवनाथ भोळे, श्रुती गोगटे, भावना मुणगेकर, रावजी तावडे, अनिरुद्ध आचरेकर, कामिनी ढेकणे, रश्मी आंगणे, श्रद्धा वाळके, शिवराज सावंत आदी कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी आणि हिरलेकर कुटुंबीय, कथामाला कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.