सावंतवाडीची संस्कृती बदलतेय?
पक्ष बदलले तसे नेते सुद्धा बदलले.. आणि बदलली नेत्यांची नीती..
सावंतवाडी सारख्या संस्थानकालीन सुसंस्कृत शांत शहरात सुसंस्कृत, सभ्य नेते होऊन गेले. आजही काही सभ्य नेते सावंतवाडीचा इतिहास जपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. परंतु त्याच त्याच नेत्यांना आणि त्यांच्या आश्वासनांना कंटाळलेल्या सावंतवाडीच्या सुजाण नागरिकांना बदल हवा होता. कदाचित सावंतवाडीच्या राजकारणात बदल घडल्यास संपूर्ण शहरी जीवनावर त्याचा काय परिणाम होईल याची सावंतवाडीकर जनतेने कल्पनाही केली नसेल, त्यामुळे कित्येकांनी ज्यांनी हात ओले केले त्यांना मतदान करून मोकळे झाले आणि एकदाचा सावंतवाडी बदल घडवून आणलाच….! पण तो बदल सावंतवाडीकर जनतेच्या भल्यासाठी झाला का?
सावंतवाडीत जिथे ऐतिहासिक सभा झाल्या त्या गांधी चौकात नगरपलिकेच्या एका जाहीर सभेला संबोधित करताना सावंतवाडीतून नगरपालिकेसाठी विरोधी पक्षाने दिलेला एक उमेदवार हा अवैद्य दारू धंद्याशी निगडित असल्याने विरोधकांवर शिरसंधान साधले गेले होते. “आमचे उमेदवार पहा कसे स्वच्छ चारित्र्याचे आहेत आणि तुमचे…” परंतु सावंतवाडीकर जनतेने १७/० निकाल देऊन सत्ताधारी पक्षाला निर्विवाद सत्ता बहाल केली होती. परंतु नियतीचे फासे उलटे पडले आणि आज सावंतवाडीकर जनतेला प्रश्न पडला आहे पक्षाचे उमेदवार, शहरातील लोकप्रतिनिधी आणि नेते?
सावंतवाडीच्या जनतेला अपेक्षित असणारा बदल दीपक केसरकर यांना दूर सारून सावंतवाडीकरांनी करवून घेतलाच आहे. परंतु प्रश्न उभा राहिलाय तो सावंतवाडीची संस्कृती आज कुठे लोप पावत चालली आहे? बदल तर घडलाच परंतु अवैद्य दारूच्या व्यवसायात बादशहात असलेल्या व्यक्ती आल्याने सावंतवाडीतील तरुण पिढी मात्र सहज मिळणाऱ्या पैशांच्या आशेपोटी दारूच्या अनधिकृत व्यवसायात गुरफटली गेली. वाह्यात झालेली कित्येक टवाळखोरांची टोळकी आज रस्तोरस्ती महागड्या गाड्या वेगात चालवीत, फुटपाथ, तळ्याचा काठ, आदी ठिकाणी दहशत माजवताना दिसत आहेत. दारूच्या व्यवसायाशी निगडित असल्याने पोलीस असो वा इतर सुजाण सुसंस्कृत नागरिक सुद्धा विनाकारण त्यांच्या लफडयात पडण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्षच करताना दिसत आहेत. चांगल्या, श्रीमंत घराण्यातील कित्येकांची मुले देखील या टवाळ पोरांच्या नादाला लागून अवैद्य धंद्यांकडे ओढली जात आहेत आणि आपल्या शहरातील सुशिक्षित नागरिक, समाजसेवक देखील बघत राहण्यापेक्षा काहीही करत नाहीत. पोलिसांकडे तक्रार गेल्यास काही मुलांचे पालक देखील त्या मुलांना पाठीशी घालतात, आमच्या मुलांचं आम्ही पाहून घेऊ अशी दुरुत्तरे करतात, त्यामुळे सावंतवाडीची भावी पिढी विनाशाकडे जात तर नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात उभा राहत आहे.
सावंतवाडीच्या या बदलत्या संस्कृतीला जबाबदार देखील सावंतवाडीकर लोकच आहेत. त्यामुळेच सावंतवाडीकर सुजाण नागरिकांना आज एकच प्रश्न भेडसावतो आहे तो म्हणजे खरंच…. सावंतवाडीची संस्कृती बदलतेय?
क्रमशः