*कार्यकर्ते पक्षनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ…?*
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडी घडल्या आणि राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे यांनी गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानाने उभे राहण्यासाठी खडतर प्रयत्न केले, पक्ष वाढविला आणि शरद पवारांना राजकीय प्रवासात उत्तम अशी साथ दिली ते अजित पवार आज शरद पवार यांची साथ सोडून शिवसेना-भाजप युतीबरोबर राज्य सरकारमध्ये सामील झाले. यापूर्वी देखील अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी सोहळा करून भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती परंतु शरद पवार यांनी राजकारणातील आपले डावपेच वापरत शिवसेनेसोबत युती करून महाविकास आघाडी सरकार स्थापन करत अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिले होते.
राजकारणात काहीही घडते याचा प्रत्यय येत शिवसेनेचे मोठमोठे नेते मंत्री शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून भाजप सोबत युती करत महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे सरकार आले आणि अजित पवार यांना विरोधी पक्ष नेते म्हणून विधानसभेत बसण्याची वेळ आली. अलीकडेच शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ त्यांची कन्या खास.सुप्रिया सुळे यांच्या गळ्यात घालून अजित पवार यांना पक्षाच्या कुठल्याही जबाबदारीवर न ठेवता मुक्त ठेवले होते. त्यामुळे आज ना उद्या अजित पवार काहीतरी वेगळा निर्णय घेतील हे ठरलेलेच होते. रविवार दिनांक 2 जुलै रोजी महाराष्ट्राच्या राजकारणाने एक वेगळे वळण घेतले आणि शिवसेना-भाजप अशा दोन इंजिनवर चाललेल्या सरकारला राष्ट्रवादीच्या अजित पवारांसह 40 आमदारांनी पाठिंबा दिल्याने तिसरे इंजिन जोडले गेले आणि राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे; त्याचप्रमाणे अजितदादांसारख्या धडाकेबाज नेत्यांचे सुद्धा समर्थक सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हास्तरीय अनेक नेते आपला मोबाईल फ्लाईट मोडवर करून कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेले तर काहींनी आपल्या व्हाट्सअप प्रोफाइल फोटोवर अजित पवार यांच्यासोबत असलेला स्वतःचा फोटो लावत आपण अजित पवार यांचे समर्थक असल्याचे जाहीरपणे दाखवून दिले. काही दिवसापूर्वी शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वर्धापन दिनदिवशी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांनी कुडाळ येथे वर्धापन दिन नसून “गद्दार दिन” असे म्हणत खोके आंदोलन करून शिवसेना शिंदे गटाची खिल्ली उडवली होती. परंतु “करावे तसे भरावे” या उक्तीप्रमाणे त्यांची खेळी त्यांच्याच अंगलट आल्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हास्तरीय अनेक नेते तोंड लपवून बसल्याचेही जनतेने पाहिले.
जिल्हास्तरीय नेते पक्षनिष्ठा दाखवत आपल्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन लढत असतात आणि वरिष्ठ नेते आपल्या मनमर्जीप्रमाणे पक्ष बदलत तर कधी पक्षाचा गाडा दुसऱ्यांच्या गाडीला जुंपत कार्यकर्त्यांची फरपट करत असतात. तरीदेखील पक्षीय राजकारणापेक्षा राजकारणात राहून आपली पोळी भाजून घेण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी आपले नेते ज्या ठिकाणी जातील त्यांच्या मागून शेळ्या मेंढ्यांप्रमाणे जात असतात. त्यावेळी मात्र त्यांची पक्षनिष्ठा कुठेही दिसत नसते; केवळ राजकारणातून स्वार्थ साधने एवढेच त्यांना माहीत असते अनेक जण आपल्या पक्षावर सोशल मीडिया अथवा प्रिंट मीडिया मधून टीका झाल्यानंतर गळे काढून तोंड सुख घेत असतात, आपली पक्षनिष्ठा दाखविण्यासाठी छाती बडवत असतात; परंतु पक्ष नेतृत्वाने स्वतःचे नेतृत्वच बदललं की त्यांना मात्र तोंड लपवायला जागा सुद्धा उरत नाही आणि ते सुद्धा कुठल्याही पक्षाचे उरत नसतात. अजित पवार यांनी युतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काहीजण त्यांच्या समर्थनार्थ अजित पवार यांचा फोटो डीपी ला लावतील तर काही पुढे काय घडतंय हे पाहत गप गुमान बसतील अन्यथा राजकीय संन्यास घेतील.. कारण राजकारण आज सत्याचे राहिलेले नसून पैशाचे झालेले आहे; जे स्वार्थासाठी राजकारण करतात तेच पैशाच्या राजकारणात टिकू शकतात हे मात्र तेवढेच खरे.