You are currently viewing पाहुणेर

पाहुणेर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री जयश्री जिवाजी कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पाहुणेर*

 

वेड्या पाऊलांना लागे आता पंढरीची ओढ

वारीमध्ये घातली मी देह मनाची सांगड

 

मुखी विठ्ठलाचे नाम नेत्री विठ्ठलाचे रूप

टाळमृदुंग घोषात मिळे आनंद अमाप

 

पाय नाचती तालात कधी घालते फुगडी

माझ्या समवेत होतो विठू माझा खेळगडी

 

उन झेलले कितीक आता भिजवी पाऊस

वारी सोहळ्यात विठू सारी पुरवितो हौस

 

आली पंढरी पंढरी विठू उभा वेशीपाशी

अति आवेगाने भक्ता कवटाळतो उराशी

 

लिंबलोण उतरुन टाकी माझी रखुमाय

म्हणे दमली लेकरे विठू त्यांचे चेपी पाय

 

पंढरीच्या प्रांगणात भक्तांची ही मांदियाळी

कोणी बुक्का लावतसे कोणी अबीर उधळी

 

सारी भावंडे पाहून चंद्रभागा धन्य झाली

त्यांचे चरण धुवाया लगबग पुढे आली

 

दोन दिसांचा विसावा दोन दिसांचे माहेर

साऱ्या लेकरांचा विठू तिथे करी पाहूणेर

 

सुख वात्सल्य प्रेमाने माय माझी भरी ओटी

पुन्हा पुन्हा येते इथे विठू याच सुखासाठी

 

पुन्हा पुन्हा येते इथे विठू याचं सुखासाठी

 

जयश्री जिवाजी कुलकर्णी

नाशिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − nine =