*रेडी उषानगर येथील जुगार सुरूच* *पत्त्यांमधील राजांना राजकिय आश्रय*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले जुगार हे वरवर जरी पत्त्यांचे खेळ वाटत असले तरी एका रात्रीत या पत्त्यांच्या खेळांमध्ये राजाचा रंग होतो तर कोणी रंकाचा राजा होतो.. पण खेळणारे सर्व रंक झाले तरी खेळ खेळवणारे मात्र नक्कीच राजे होतात, आणि हेच राजे राजकीय आश्रय घेत राज्य सरकारच्या खाकी वर्दीला जणू काय आपले नोकर असल्यासारखे वागवतात. असाच काहीसा खेळ सुरू आहे तो नाम.दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात.
सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग हा अलीकडेच शिवसेना-भाजप युतीच्या स्थापन झालेल्या सरकारमधील सर्वात जास्त गवगवा झालेले मंत्री दीपक केसरकर यांचा मतदारसंघ. नाम. दीपक केसरकर यांचे शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये फार मोठे वजन असल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यांच्या वजनामुळेच काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करत सावंतवाडी मध्ये दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास निधी देत भूमिपूजने केली होती. त्यामुळे सरकारमध्ये दीपक केसरकर यांचे वजन असल्याचे दिसून येते. परंतु गेले बरेच दिवस सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव, वेंगुर्ला तालुक्यातील रेडी या ठिकाणी जुगाराच्या बैठका मोठ्या प्रमाणावर बसत असून गोवा, मालवण, कणकवली आदी परिसरातून येणाऱ्या जुगार्यांकडून एका रात्रीत लाखोंची उलाढाल होते आणि या सर्व बैठकांना मोठा पाठिंबा मिळतो तो सत्तेतील राजकीय लोकांचा. असाच राजकीय वरदहस्ता खाली रेडी उषा नगर येथे गेले बरेच दिवस जुगार सुरू असून खाकी वर्दीचा देखील आपले हात ओले करून घेत या जुगार्यांना खुलेआम पाठिंबा असल्याचे सूत्रांकडून समजते. राजकीय आश्रय मिळत असल्याने खाकी वर्दी देखील सत्तेतील लोकप्रतिनिधींच्या बळावर जुगाऱ्यांना आशीर्वाद देत असतात. त्यामुळे नाम. दीपक केसरकर यांचा त्यांच्याच मतदारसंघातील पोलीस प्रशासनावर वचक नसल्याचे पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून येत आहे. एकेकाळी दीपक केसरकर म्हणजे अवैद्य धंद्यांना जोरदार विरोध करणारे नेते म्हणून जाणले जात होते, परंतु राज्यातील राजकीय सूत्रे बदलली आणि नाम.दीपक केसरकर यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यामुळे राज्यातील सत्तांतरामध्ये मशगुल राहिल्याने मतदार संघाकडे दीपक केसरकर यांचा दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
रेडी उषा नगर येथे सुरू असलेल्या जुगारामुळे त्रस्त असलेल्या रेडी येथील बचत गटाच्या महिला याबाबत आवाज उठविण्यासाठी दीपक केसरकर यांच्या कार्यालयात जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे नामदार दीपक केसरकर आता तरी आपल्या मतदारसंघात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे गांभीर्याने लक्ष देणार आहेत की नाहीत..? असा प्रश्न उपस्थित होत आहे.