“रणरागिणी… स्व.शोभा गावडे”

“रणरागिणी… स्व.शोभा गावडे”

कां कुणास ठावूक पण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय आणि कामगार क्षेत्रातही एक छोटा बिंदू बनून काही काळ काम केलं अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती या गेल्या पाच सहा महिन्यात या जगाचा कायमचा निरोप घेत आहेत. अनेक जवळचे स्नेही, मित्र, हितचिंतक सोडून जात आहेत…आणि रहातात फक्त आठवणी. अशीच काल अचानक एक दुर्दैवी आणि दुःखदायक बातमी ऐकायला मिळाली.
आदरणीय शोभा गावडे. न्यायासाठी, सत्यासाठी सतत संघर्ष करणाऱ्या एक रोखठोक स्वभावाच्या आमच्या एकेकाळच्या जेष्ठ सहकारी… हो सहकारीच. गावपातळीवर त्यांच काम होतचं पण दुर्लक्षित घटकांसाठी झोकून देवून काम करण्याचा त्यांचा स्वभाव आणि अनुभव मी जवळून घेतलाय.
मला आठवत, १९९२नंतर आपल्या देशाने डंकेल प्रस्ताव स्विकारला. खुले आर्थिक धोरण आणि जागतिक स्तरावरील मुक्त अर्थव्यवस्था स्विकारल्याने भारतातील संघटीत आणि असंघटित क्षेत्रातील त्याचे कामगार वर्गावर.  होणारे परिणाम आणि आर्थिक शोषण याचा विचार करुन भारतीय मजदूर संघाचे संस्थापक श्रध्देय दंत्तोपंत ठेंगडीजी यांनी या डंकेल प्रस्तावाला विरोध करण्यासाठी देशपातळीवर आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला. त्याचाच एक भाग म्हणून दिल्लीत लांखोच्या मोर्चाचे नियोजन केलेले होते. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भा.म.संघाचे अध्यक्ष  श्रीधर काळे होते व मी जिल्हा सरचिटणीस होतो. तेव्हा भा.म.संघाशी संलग्न जिल्ह्यातील जनस्वास्थरक्षकांची संघटना बांधली होती..  आणि त्याचे नेतृत्व स्व.शोभा गावडे करत होत्या. त्यामुळे त्या दिल्लीच्या मोर्चासाठी त्या आमच्या सोबत होत्या. अर्थात कामगारांचे जथेच्या जथे रेल्वेत घुसून जात होते. पोस्ट, रेल्वे, विमा व असंघटित क्षेत्रातीलही कामगार होते..  अर्थात आंदोलन म्हणजे आमच जयश्रीराम टिकीटं. शोभाताईसह आमच्या जिल्ह्यातील सुमारे दोनशेपेक्षा जास्त प्रतिनिधी होते. मला तो प्रसंग जशाचा तसा आठवतो. मनमाड जक्शनला रेल्वे पोलीसांनी आम्हाला दंडुकेशाही दाखवायला सुरुवात केली तेव्हा स्व.शोभाताई कडाडल्या,”खबरदार आमच्या माणसांना हात लावालं तर, आम्ही काही गुन्हेगार नाहीत. त्यांच्या सोबत मिरज, कोल्हापूर रत्नागिरी येथील पण महिला भगीनी होत्या. एकजुटीने आम्हाला रेल्वेतून बाहेर काढण्याचा रेल्वे पोलीसांचा प्रयत्न हाणून पाडला आणि आम्ही दिल्लीत मोर्चात सहभागी झालो. त्या प्रवासात आणि आंदोलनात अगदी जवळून शोभाताईना अनुभवता आलं..  आज त्यांच्या जाण्याने या प्रसंगाची आठवण झाली. गेली तीनचार वर्षे त्यांची भेट नाही. मिलाग्रीस हायस्कूलमध्ये कार्यरत असलेल्या त्यांच्या स्नुषा सौ.अनिता यांच्याकडून कधीतरी माहिती मिळायची.
ग्रामीण भागात स्त्रियांचे प्रश्न घेउन काम करणाऱ्या आणि अन्याय, अंत्याचाराविरूध्द सतत संघर्ष करणाऱ्या रणरागिणीनीच्या अकाली निधनामुळे मळेवाड पंचक्रोशी बरोबर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचही फार नुकसान झाल.
हे दुःख पचवण्याचं सामर्थ्य त्यांच्या कुटुंबियांना परमेश्वराने देवो,हीच प्रार्थना.
“We miss you Shobhatai ,..We miss you.
भावपूर्ण आदरांजली…
… अँड.नकुल पार्सेकर…

प्रतिक्रिया व्यक्त करा