You are currently viewing कोमसाप मालवणची अक्षरदिंडी

कोमसाप मालवणची अक्षरदिंडी

मालवण :

“सर्व संतांनी मराठी भाषेला अलंकारित केले. अभंग रचना करून मराठी भाषेला सजविले. “माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ऐशी अक्षरे रसिके मेळविण” अशा रचना करून ज्ञानोबांनी जगाला मराठीची थोरवी सांगितली. तर “मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसै” असा सज्जड दम भरून तुकोबांनी मराठी बाणा कसा असतो ते सांगितले. त्या संत रचनानी आज कोमसाप मालवणने आयोजित केलेली अक्षरदिंडी मला खऱ्या अर्थाने मराठीची गौरव दिंडी वाटते,” असे उद्गार सुरेश शा. ठाकूर, अध्यक्ष कोमसाप मालवण यांनी कोमसाच्या अक्षर दिंडीचा शुभारंभ करताना काढले.

आषाढी एकादशीचे निमित्त साधून कोकण मराठी साहित्य परिषदेने ऑनलाईन अक्षर दिंडीचे आयोजन केले होते यात रामचंद्र वालावलकर (येई बा विठ्ठला), स्मिता शितुत (विठू माऊली), नारायण धुरी (पुण्य मोठे), चंद्रशेखर हडप (एकादशीचा उपवास), अनुराधा आचरेकर (माझा विठ्ठल), अनघा नेरुरकर (भक्त आणि भगवंताचे नाते), ह्रदयनाथ गावडे (हृदयीचा भाव), गजानन कांदळगावकर (आषाढवारी), सुरेंद्र सकपाळ (पंढरीची वारी), विजयकुमार शिंदे (तुझ्या दर्शनाची आस), अदिती मसुरकर (आस तुझ्या दर्शनाची), एकनाथ गायकवाड (आम्ही वारकरी,वारी), चारुशीला देऊलकर (विठ्ठल), रामचंद्र कुबल (सावळे आभास), रसिका तेंडोलकर (विठुराया) , मंदार सांबारी (पंढरीची वारी, पंढरीच्या पांडुरंग हरी, नाम महिमा) आदी सदस्यांनी संतरचना सादर केल्या तर पुर्वा खाडिलकर, माधव गावकर यांनी अभंग गायन केले.

अक्षरदिंडी यशस्वी केल्याबद्दल गुरुनाथ ताम्हणकर, (उपाध्यक्ष कोमसाप) यानी अक्षर दिंडीतील सर्व कवी, कवयित्री आणि गायक वाराकर्यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा