प्राधिकरण निगडी / (प्रतिनिधी) :
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातील स्वानंद संघाने, “पावसाचा एक वेगळाच आविष्कार” तुकाराम बागेत सादर केला.
विनंती माझी पयोधराला
शांतवी जगताची तृषा!!
पुष्पा नगरकर यांनी लिहिलेल्या व उमा इनामदार व मालती केसकर यांनी गायलेल्या या ईशस्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. पुष्पा नगरकर लिखित “पाऊस नक्षत्रांचा ” या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून पावसाच्या छटांची वैशिष्ट्ये सांगून , पावसाची वेगळीच ओळख करून दिली. या नक्षत्रांचे सुरेख सादरीकरण, ज्योती कानेटकर, अशोक अडावदकर, चंद्रशेखर जोशी, उमा इनामदार, सुनीता येन्नुवार, शरद येन्नुवार आनंद मुळूक, उषा भिसे, स्मिता देशपांडे, व माधुरी ओक या स्वानंदच्या सदस्य कलाकारांनी केले.
उमा इनामदार यांनी “सांग सांग भोलानाथ” हे बालगीत, संस्कृत भाषेमध्ये अनुवादित करून सादर केले व प्रेक्षकांची दाद मिळवली.
पुष्पा नगरकर यांनी, त्यांच्या शेतातील पाऊस वादळामुळे उन्मळून पडलेल्या मोठ्या आम्रवृक्षाला पुनर्जीवित केलेल्या संवेदनशील स्वानुभव काव्यभिनयातून सादर करून रसिकांच्या भावना हेलावून टाकल्या. हे नाट्यपूर्ण काव्यवाचन ज्योती कानेटकर यांनी उत्कटपणे प्रस्तुत केले.
रजनी गांधी यांनी “मेघा छाए आधी रात” तर मालती केसकर यांनी “रिमझिम पाऊस पडे सारखा” ही गीते सादर करून पावसाच्या वेगळ्या छटा दाखविल्या. स्मिता देशपांडे यांनी पावसातील संकटातून बाहेर पडल्याचा अनुभव कथन केला.
हिंदी व मराठी जुनी नवी पाऊस गीतांच्या मेडलीने या चिंब पाऊस कार्यक्रमाची सांगता झाली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन, निवेदन व दिग्दर्शन ज्योती कानेटकर यांनी केले.
पावसाच्या संततधारेने, या कार्यक्रमात अविरत बरसून कार्यक्रमाला आणखीच बहार आणली.
तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहातील रसिकांच्या मनात एक वेगळाच पाऊस ठसला व बरसला.
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा अर्चना वर्टीकर, तसेच कार्यकारिणी सदस्य, सभासद, मान्यवर, तसेच सामाजिक कार्यकर्त्या भारती फरांदे आवर्जून हजर होत्या.