वेंगुर्ला
ज्यांच्या पराक्रमामुळे आज अखिल हिंदु समाज आनंदाने दिवाळी साजरी करु शकत आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराज तसेच जिजाऊ माँसाहेब यांच्या स्मारकांवर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवप्रेमींच्यावतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला.
दीपावलीला प्रत्येकजण घरासमोर रांगोळी, दिवे लावणे, विद्युत रोषणाई करत असतो. परंतुु अनेकवेळा ज्यांच्या पराक्रमामुळे आज आपण दिवाळी साजरी करत आहोत, त्या महापुरुषांकडे मात्र दुर्लक्ष होते. प्रत्येकाच्या घरी उजेड असतो, मात्र ज्यांनी गुलामीचा अंधकार हटवून स्वराज्याचा सुर्योदय घडवला, त्या महापुरुषांच्या स्मारकासमोर ऐन दिवाळीतच अंध:कार असतो.
सदर बाब लक्षात घेऊन यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवप्रेमींच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज तसेच जिजाऊ माँसाहेब यांचे स्मारकांवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये रेडी येथील यशवंतगड, सरगवे-दोडामार्ग, ओरोस, कुडाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच जिजाऊ माँसाहेब यांच्या स्मारकांवर दीपावलीच्या अनुषंगाने स्मारकांची साफसफाई करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन संध्याकाळच्या सत्रात रांगोळ्या घालून दीपोत्सव साजरा करण्यात आला. वरील उपक्रमाला समाजाकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला.