You are currently viewing बांदा नं.१ केंद्र शाळेत विठ्ठल नामाची शाळा भरली

बांदा नं.१ केंद्र शाळेत विठ्ठल नामाची शाळा भरली

*बांदा नं.१ केंद्र शाळेत विठ्ठल नामाची शाळा भरली*

*बांदा*

वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात बांदा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी बांदा केंद्र शाळा ते विठ्ठल मंदिर इथपर्यंत पायी दिंडीचे आयोजन करून बांदा शहरात विठ्ठलमय वातावरण निर्माण केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल -रखुमाई, विविध संत, वारकरी यांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या.यावेळी रिंगण सोहळा व फुगडी यांचे आकर्षण ठरले.
एरवी शाळेच्या गणवेशात असणारे विद्यार्थी आज पांढरा सदरा, डोक्यावर टोपी, कपाळावर बुक्का, हातात पताका, आणि नऊवारीत असलेल्या मुली , केसात गजरा असा पेहराव करून डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या .
यावेळी शाळेच्या परिसरात रिंगण सोहळ्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी अनुभवला. संस्कृती व परंपरेचे दर्शन या सोहळ्यातून घडून आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या पायी दिंडी वारीचे बांदा विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी मंदिरात अभंग गायन ,फुगड्या यांचे सादरीकरण करून विठ्ठल भक्तांची वाहवा मिळवली
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, पदवीधर शिक्षक उर्मिला मोर्ये, उपशिक्षक शिक्षक जे.डी. पाटील यासह सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक ,शाळा व्यवस्थापन समिती यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा